जिव्हेला साद देणारी साखर ज्या उसाच्या कांड्यातून मिळते ते उसाचे कांडे जरी उबडधोबड असले तरी त्यातून निघणारा उसाचा रस हा स्वादिेष्टच असतो.
तेव्हा काय भुललासी वरलीया रंगा, रस हा अंतरंगात भरलेला असतो.
माणसाने नुसते सौदर्य, श्रीमंती पाहुन माणसाची पारख करु नये. त्याच्या अंतरंगाचा ठाव घ्यावा. त्यामध्ये प्रेमाचा रंग भरलेला असतो.
परमेश्वराने प्रत्येक प्राणीमित्राला भरभरुन दिले आहे. काहीना देण्याचे तो विसरला आहे. म्हणून नाराज व्हायचे नाही. ज्यांना भरभरुन दिले आहे, त्यामध्ये काहीतरी कमतरता ठेवली असते. त्यामुळे त्याला त्याची सतत आठवण होत रहाते व ती कमतरता घालविणेसाठी तो आयुष्यभर प्रयत्न करीत असतो.
तर दुसरीकडे एखाद्याला अपंगत्व आलेले असते व त्यामुळे तो दु:खी असतो, त्याला परमेश्वराने अशी एखादी कला दिलेली असते की ज्यामुळे तो सर्वांवर छाप पाडू शकतो, अधिपत्य करु शकतो.
प्रत्येक माणसामध्ये काहीना काही कमतरता असतेच. पण त्याकडे न पहाता अंतर्मुख होऊन, चिंतन करुन आपल्यात जे चांगले आहे, जो चांगला रस आहे तो इतरांना देऊन त्यांना समाधानी करणे हे खरे संतांचे लक्षण होय.
अशा संतांनी प्रपंचातील अनेक दु:ख दायक अनुभवाचे दाखले देऊन दाखवून दिले आहे.
ऊस डोंगा, परी रस नही डोंगा. काय भुललासी वरलीया रंगा.
जीवन जगत असताना अंतर्मनातील प्रेमाला महत्व आहे. आधाराला महत्व आहे. कायेने – वाचेने नुसते बाह्य सौंदर्य वाढविणारे लोक फसवितात. रसरंग देऊन बहुल्याच्या माध्यमातून लोकांची फसवणून करतात. तेव्हा या त्यांच्या बाह्य रुपाकडे पाहु नका, त्यांचे अंत:करण तपासा. त्यामध्ये असलेला मधुर रस प्राशन करा व आनंदी व्हा.
विवेकी माणुस कधी ही वरच्या वरच्या सौंदर्याने भाळून जात नाही. त्यांचे ध्यान अंतर्मनातील मधुर रसाकडे असते.