बासरी म्हटले की श्रीकृष्णाची आठवण होते. श्रीकृष्णाचे आवडते वाद्य म्हणजे बासरी.
खरोखर या बासरीची किमया फार मोठी . ही बासरी बांबु पासून तयार करतात. हा बांबु तोडताना पण तिथी पाहून तोडला जातो. जसे पंचमी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी या तिथीला बांबू तोडत नाहीत. कारण या तिथीला बांबु तोडला तर त्याला हमखास कीड लागते. असे बासरी करणार्यांचे मत आहे.
या पाठीमागे पारमार्थीक पण कारण आहे. त्या कारणाचा विचार करता असे दिसून येते की, वर सांगितलेल्या तिथीमध्ये शेवटी ‘मी’‘मी’ हे येते व या मी पणातून अहंकार उत्पन्न होतो व कार्यनाश होतो. बासरी टिकत नाही.
एकदा असेच झाले सर्व गोपीका चिडल्या व म्हणाल्या देवा आम्ही कृष्णाची एवढी स्तुती करतो, त्याच्या आवतीभोवती वावरतो पण तो आम्हाला साधा भाव ही देत नाही.
तु तर एवढी साधी, ना रुप, ना रंग पण तो तुला सतत ओठाशी धरुन असतो. तू अशी काय त्याचेवर जादू केली आहेस?
बासरी हसली व म्हणाली, तुम्ही माझ्या सारख्या व्हा मग कृष्ण तुम्हाला जवळ करील.
गोपींनी बासरीकडे पाहिले, ती म्हणाली, मी अगदी सरळ आहे, ना एखादं वळण, ना एखादी गांठ मी पोकळ आहे, पारदर्शक आहे. या पोकळीतून माझा अहंकार गळून पडला आहे.
माझ्या अंगावरील सहा छिद्रामधून काम, क्रोध, मोह, लोभ, माया, मस्तर हे शत्रु मी काढून टाकले आहेत.
मला स्वत:चा असा आवाज ही नाही. तो श्रीकृष्ण जशी फुंकर मारेल तशी मी बोलते.
यावर गोपी निरुत्तर झाल्या, त्या समजून गेल्या, अहंकार रहीत शरीर हीच श्रीकृष्णाची बासरी होय.
ज्या साधकाने आपल्या जीवनातून अहंकार घालविला, मी पणा दूर केला त्याचेच जीवन आनंदमय, सुखकारक, झाल्याशिवाय रहात नाही.
प्रत्येक साधकाने श्रीकृष्णाचे बासरीतून जीवनाचे सूर आळवावेत व आनंदी जीवन जगावे.
अशी ही आहे श्रीकृष्ण बासरी.
पहा आहे का तुमचे नशिबी…