नम्रता

‘नम्रता’ हा एक भाव आहे. गुण आहे. तो माणसाला विनम्र बनवितो.

नम्रता म्हणजे अज्ञाधारकता, शालीनता, विवेकीपणा, थोरामोठ्यांचा मान राखण्याची वृत्ती गुरुजनांना वंदन करण्याची प्रवृत्ती या सर्व गोष्टी नम्रता या सदरात बसतात.

माणसाला जर खरा आनंद हवा असेल. परमेश्‍वराचे दर्शन हवे असेल, कोणत्याही गोष्टीत यश मिळवायचे असेल तर नम्रता हा गुण अंगी रुजविणे गरजेचे आहे.

पहाना.. मंदीरात जावून परमेश्‍वराचे दर्शन घ्यावयाचे असेल तर उद्धटपणाने आत प्रवेश घेता येत नाही.

तेथे छोटा दरवाजा केलेला असतो. त्या दरवाजातून आत जाताना माणसाला वाकावे लागते, विनम्र व्हावे लागते. तरच परमेश्‍वर दर्शनाचा त्याला आनंद मिळतो.

या जगातील ज्या ज्या मोठ्या व्यक्ती होवून गेल्या त्या राजकारणी होत्या, समाजकाणी होत्या, शिक्षणप्रेमी होत्या. प्रत्येकाजवळ नम्रता दिसून येत होती. त्या नम्रतेमुळे त्यांनी आपले नांव अजरामर केले.

भारतीय संस्कृती हेच सांगत आहे. तुम्ही नम्र बना, उद्धटपणा सोडून द्या. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद हवे असतील तर त्यांचे चरणावर आपले मस्तक ठेऊन दोन हात-दोन पाय व मस्तक अशा पंचांग भावनेनी आपण यांना नमस्कार केला पाहिजे.

साधूसंत, भगवान यांनी आपल्या अंगी हा भाव आणण्यासाठी तपश्‍चर्या केली. विवेकाने विचार केला, चिंतन केले व ते विनम्र बनले.

आज हजारो लाखो लोक त्यांचे चरणावर मस्तक ठेवीत आहेत. एका नम्र भावाचा केवढा हा प्रताप.

जो हा भाव जिंकतो तो परमेश्‍वर होऊन सर्वांसमोर थांबतो.

Leave a comment