जी मनातून कधीही जात नाही ती जात होय.
या जातीचे दोन प्रकार आहेत.
1) उच्च जात 2) नीच (कनिष्ठ) जात.
या द्वंद्वात माणूस अडकतो व आपली खरी जात कोणती हे विसरतो.
समाजात वावरत असताना आपण पहातो. तेथे सतरा पघड जातीला उत आला आहे.
कोण म्हणतो मी हिंदु आहे. कोण म्हणतो मी मुस्लीम आहे. तर कोण म्हणतो मी इसाई आहे, कोण ख्रिश्चन म्हणतो, मी म्हणतो जैन आहे, कोण बौद्ध म्हणून घेतात.
अशा प्रकारे प्रत्येकजण आपली ओळख सांगत असतो व समाज व राजाकारणी त्याला मान्यता देतात. मोठ्या कुळात जन्माला आलेला उच्च कुलीन समजला जातो तर ज्ञानाने समृद्ध असला तरी कनिष्ठ कुळातील नीच समजला जातो.
या समाजामध्ये ज्ञानाला किंमत नाही. तो अमूक जातीचा आहे हा शिक्का महत्वाचा मानला जातो. त्यावर त्याचे काम घडते अगर बिचडते.
आपण म्हणतो परमेश्वर सर्व चरारामध्ये भरलेला आहे. तर मग त्या परमेश्वराचा अंश पण सर्व माणसात आहे. तेव्हा एक श्रेष्ठ एक कनिष्ठ असा दूजा भाव कां ? हा द्वैत भाव माणसांनी आपल्या स्वार्थासाठी केला. त्यामुळेच समाजात स्पर्धा, ईर्षा, कलह दिसून येतो.
तेव्हा चिंतन करताना मानवी जीवन ही समाजाची मुख्य जात आहे. हे ध्यानात येते. मी माणूस म्हणून जन्माला आलो व माझ्या बरोबर इतरांचे कल्याण करीत करीत मी माझे जीवन व्यतीत करणार आहे. ही भावना मनांत ठेवून त्या भोवती विचार करीत कुठलाही व्यवसाय कर्म सुरु करीन व सर्वांचे कल्याण करण्याचा प्रयत्न करीन. ही भावना मानवजातीची असणे गरजेचे आहे.
प्रपंच तर प्रत्येकाला करावयाचा असतो. पण स्वत:बरोबर इतरांना तो सुखाचा वाटेल असे वागणे ही मानवतेची खरी ओळख आहे.
ज्यांनी ही ओळख ठेवली त्यांनी आपल्या आयुष्याचे कल्याण करुन घेतले असे मला वाटते.
अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या प्रमुख गरजा आहेत. त्या गरजूंना देणे. नम्रतेने सर्वांशी व्यवहार करणे. विनयशील वृत्ती ठेवणे, ही वृत्ती म्हणजे मानवाची खरी जात प्रकट करणे होय.
अशा या श्रेष्ठ मानवतावादी जातीचे आचरण करणे फार कठीण काम आहे. त्यासाठी माणसाला बरीच चिंतने करावी लागतील. घोर तपश्चर्या करावी लागेल. काम, क्रोध, मोह, माया, मत्सर, राग यांचे हवन करावे लागेल.
या तपश्चर्येचे फळ म्हणून त्याला ‘‘मानवधर्माचे’’ मानव जातीचे प्रमाण पत्रक मिळेल. हीच खरी श्रेष्ठ जात आहे असे मला वाटते.
मनुष्य धर्म, मानव धर्म हीच खरी मानवी जीवनाची खरी जात आहे. ज्या ठिकाणी ही जात जाते तेथून सर्व जाती निघून जातात.
यासाठी जेथून जात जात नाही तेथे मानवी जातीला जावू द्या यात सर्व मानवाचे कल्याण आहे.
मानवता वादी धर्म ही मानव जीवनामध्ये खरी जात आहे.