मन – मुक्ती आणि बंधन यांचे जंक्षन

मनाचा थांबा हे एक मोठे जंक्षन आहे.

त्या थांब्यावर मनावर अनेक ठिकाणी जाणार्‍या गाड्या उभ्या आहेत, आपणाला ठरवायचे असते कोणत्या गाडीत बसायचे.

एक गाडी दक्षिणकडे कन्याकुमारी पर्यंत जाणारी असते. तर दुसरी उत्तरेकडे जम्मु काश्मीर कडे नेणारी असते. अशाच बर्‍याच गाड्या समोर उभ्या असतात. आपण गोंधळून जातो. नक्की कुठे व कोणत्या गाडीत बसून प्रवास करावयाचा.

येथे मनाच्या थांब्यावर अनेक मोहाच्या पाट्या लावलेल्या असतात. त्या मोहात पडून आपण नक्की कोणता मार्ग धरावा या कलहात आपण असतो.

चिंतनातून आपण जेव्हा मार्ग नक्की करतो तेव्हा आपणास त्या मार्गावर जाणार्‍या गाडीचे तिकीट मिळण्याचे ठिकाण दिसते.

आपण तिकीट घेऊन आपली त्या मार्गावरील जागा रिझर्व्ह करतो. या रिझर्व तिकीटावर मनाच्या निश्चयावर आपला प्रवास सुरु होतो तेथे सर्व कलह शांत होतात.

आपण आनंदाने प्रवासाची सुखात करतो. आपण निर्विघ्न प्रवास सुरु होतो. तेथे लक्षात येते या थांब्यामुळे, जंक्षन मुळे आपला प्रवास शांतपणे सुरु झाला.

जीवनाचा प्रवास असाच आहे हे करु कां ? ते करु ? असे प्रश्न नेहमी मनांत येत असतात. तेथे आपण गोंधळून जातो.

पण जो विवेकी असतो तो मात्र या जंक्षनवर खंबीर पणे उभा रहातो. चिंतन-मनन करुन आनंदी जीवनाच्या गाडीत बसून परमात्म्याकडे जायचे कां मोहाच्या थांब्याकडे अकर्षुन, प्रपंचात गुंतून अधोगतीस जायचे.

मन हा महत्त्वाचा थांबा लक्षात घ्यावा. प्रापंचिक पारमार्थिक सर्वजण या थांब्यावर गर्दी करुन उभे आहेत.

पारमार्थिकांनी आपले तिकीट रिझर्व्ह केलेले असते त्यामुळे त्यांना या कलहातून मुक्तीच्या मार्गावर प्रवास सुरु होतो.

तर प्रापंचिक अजून कांहीच न ठरविल्यामुळे मनाच्या थांब्यावर थांबून रहातो. गोंधळून उभा असतो.

तेथे मला लक्षात येते ‘‘मन’’ हे मुक्ती व बंधन यांचे जंक्षन आहे. मनाला चिंतनाने खंबीर करा.

मुक्तीच्या गाडीत बसा आनंदी जीवन जगा.

Leave a comment