‘रक्षक’ याचा अर्थ जो रक्षा करतो तो.
मानवी जीवनांत व सृष्टीमध्ये अनेक ठिकाणी आपणाला या रक्षकाची गरज भासते. तेव्हा हा रक्षक कोण? त्याची महती काय? याचे विवेचन आपण करणार आहोत.
घराची रक्षा करणारा गृहरक्षक असतो, एखाद्याचे पालकत्व स्विकारुन त्याची काळजी घेणारा असतो.
नदीच्या पाण्याचे संरक्षण करणारा बंधारा असतो.
तर निसर्गातील झाडे कोणी तोडू नयेत किंवा मुक्या प्राण्यांनी खाऊन उध्वस्त करु नयेत, म्हणून झाडांना कुंपण लावलेले असतात.
वीजेचा धोका होऊ नये म्हणून विद्युतरोधक बसविलेले असतात.
पावसाचा धोका होऊ नये म्हणून वर्षा आवरणे असतात.
सृष्टीमध्ये व प्राणीमात्रामध्ये अशा संरक्षक गोष्टींची गरज असते.
आपण पहातो पाऊस चांगला झाला, पेरणी उत्तम झाली, पिक चांगले आले पण टोळधाड आली व सर्व पीक खुडून गेली. तेथे पण संरक्षकाची गरज असते. कुंपण करणे गरजेचे असते किंवा भिती दाखविणारा संरक्षक शेतात उभा करावा लागतो.
सुृष्टीची उत्पत्ती ब्रम्हाने केली. सृष्टीचे रक्षण, वाढ विष्णुंनी केली आणि नको असलेल्या प्रवृत्ती माणसे संहार करणे व चांगल्यांना संरक्षण देण्याचे काम शंकराने केले. येथे पण आपणास संरक्षकाची गरज लक्षात येते.
प्राणी देखील माणसाच्या संरक्षणाचे काम इमाने एतबारे करीत असतात. बंगल्या बाहेर थांबून अनोळखी कोणी आले तर त्यापासून मालकाला कल्पना देणे, वेळप्रसंगी त्याचेवर धावून जाणे अशा संरक्षणाचे काम कुत्रा माणसाचे दारात बसून करीत असतो.
प्रपंचात रोज कोणी ना कोणी एकमेकांवर उपकार करीत असतो. त्याचे संरक्षण करीत असतो. अशा वेळी त्या संरक्षक कर्त्याची आठवण ठेवणे, रक्षकाची जाणीव ठेवणे हे मानवाचे कर्तव्य आहे.
आपली ही सर्व कर्मेंद्रिय आहेत. ती पण संरक्षक आहेत. शरीरात, मनांत, ह्रदयात वाईट प्रवृत्ती जावू नयेत म्हणून ही इंद्रिये अटोकाट प्रयत्न करतात व शरीराचे रक्षण करतात.
अशा संरक्षक शरीरामध्ये असणार्या परमेश्वराला (रक्षकाला) आपण विसरुन कसे चालेल. त्याच्या नामाचे सतत पठण केले पाहिजे. म्हणजे जीवनांत सतत सतर्कता राहिल.
होमगार्डच्या शिट्टीकडे आपण लक्ष देतो व सावध रहातो. त्याप्रमाणे आत्म्याच्या सुचनेकडे लक्ष देवून आपल्या जीवनाचे रक्षण करावे.
सध्या थैमान घातलेल्या कोविड-19 जीवाणू पासून संरक्षण होण्यासाठी आपण एक चतुःसुत्रीचा अवलंब करु 1. घराची सीमा ओलांडू नका,
2. विलगीकरण सांभाळा,
3. जास्तीत जास्त स्वच्छता कशी पाळता येईल ते पहा,
4. शरीर व मन समतोल रहाण्यासाठी योग्य चिंतन मनन करा.
आनंदी जीवन जगा.