सर्व सिद्धीचे कारण, म्हणजे प्रसन्न मन होय.
आपण रोज कुणाला तरी प्रसन्न करण्याचा प्रयास करत असतो. प्रसन्न करणे म्हणजे आपलेसे करणे. त्याला काय हवे नको ते पहाणे. त्यासाठी कष्ट करणे, त्याच्या आवडीच्या गोष्टी करणे हे सर्व आपण ज्या व्यक्तीला प्रसन्न करावयाचे असते त्या व्यक्तीकडे पाहून करत असतो.
जसे एखादे लहान मुल, त्याला काहीतरी हवे असते, पण त्याला ते मिळत नाही. तेव्हा त्याचे समोर विविध खेळणी टाकली जातात. त्या खेळण्याकडे पहात त्याच्या आवडीचे एखादे खेळणे समोर आले की त्याचे चेहर्यावर आनंद उमटतो, तो हसु लागतो व इतरांना पण आनंदी बनवितो.
जस जसे वय वाढते तसतसे आनंद देणार्या वस्तू पण बदलत जातात. आपणाला या वस्तूपासून आनंद मिळेल, त्या वस्तूपासून आनंद मिळेल, असे सारखे वाटत रहाते.
पण प्रत्यक्षात त्या वस्तुपासून आनंद मिळण्या एवजी ती वस्तू हरवली तर दु:खच होते.
अशावेळी मनांत विचार येतो तो हा, कोणत्या गोष्टीमुळे चिरकाल टिकणारा आनंद मिळेल ?
वरील विवेचनावरुन बाह्य गोष्टी आपणाला चिरकाल आनंद देणार नाहीत, हे नक्की होते.
आता आपण अंत:करणाला विचारु कुठे आनंद आहे ते ? अंत:करण म्हणजे अंतर आत्मा, म्हणजे आत्मज्ञान. हे ज्यावेळी आनंदी होईल तेव्हा आपणास चिरकाल पर्यंत टिकणारा आनंद मिळेल. त्यासाठी आपणाला बाहेर शोध घ्यावयाची गरज नाही.
येथे मनुष्य प्राण्याची होत असलेली फसगत दर्शविली आहे.
ज्या गोष्टींचा सततचा सहवास आहे अशा गोष्टी माणसाला आपणाकडे ओढून घेतात व मन ज्याकडे आपण कधीच लक्ष देत नाही, त्याचेवर बाह्य गोष्टी आकर्षित होत नाहीत.
त्या वस्तुंना मनाचा ठाव ठिकाणा माहित नसतो. हा मनाचा ठाव लागला म्हणून न दिसणारे आंत एकांतात असलेल्या मनाचे अवलोकन करणे गरजेचे आहे.
त्यासाठी योगा, मनन, चिंतन या गोष्टी गरजेच्या आहेत. यातून मनाची ठेवण माणसाच्या ध्यानात येते.
नुसते पुस्तक वाचन करण्यापेक्षा माणसांचे वाचन करणे गरजेचे आहे. यासाठी गरज आहे विवेकाची, आत्मज्ञानाची.
आत्मज्ञान ज्यावेळी मनावर प्रकाश टाकेल, म्हणजे मनाला प्रसन्न करेल तेव्हा सर्व अपेक्षित गोष्टी पूर्ण होतील. सर्व सिद्धी प्राप्त होतील.
तेव्हा ‘मन करा रे प्रसन्न’ ही उक्ती अतिशय महत्वाची आहे.
आनंदी जीवन जगण्यासाठी अंतर्मनात स्थीत असलेल्या मनाला आनंदी करा असा संदेश दिला जात आहे.