कन्या- दानात श्रेष्ठ कन्यादान

‘कन्या’ मुलगी घराची शोभा असते असं म्हटलं जात.

कन्येला कन्यारत्न पण म्हटले जाते.

कारण कन्येला लहानाची मोठी करायची म्हणजे संस्कार करा, शिक्षण द्या, घरकाम शिकवा, लाड पुरवा, किती किती खटाटोप करावे लागतात.

त्यापेक्षा अशी गुणाची कन्याच रेडिमेड मिळाली तर?

‘सुन’ म्हणजे अशी रेडिमेड कन्याच होय !

ती घरात नसली तर घर सुनं सुनं वाटतं म्हणून तिला ‘सुन’ म्हणत असावेत. किंवा जिला नव्या घरात पदार्पण केल्यावर ‘बहु’ आयामी भूूमिका वढवावी लागते तिला ‘बहु’ म्हणत असावेत.

इंग्रिजीमध्ये मात्र “Daughter in  Law” असे म्हणून   आपुलकीचा ओलावाच नष्ट केला आहे.

त्यापेक्षा “Daughter in Love”  म्हटले असते तर जास्त समर्पक वाटलं असते.

अशी ही कन्या एकदा कां आपली झाली की हिच्यात काही कमी अधिक काढायचे नाही. कारण एखाद्या वस्तुची तुलना किंवा मुल्यमापन करण्यासाठी लागणारे जे मोजमाप, युनिट किंवा ‘मापदंड’ वापरतात. ते मापच मुळी ती उलथून आलेली असते. आता ती आपल्या घराची लक्ष्मी झालेली असते.

लक्ष्मी ! कुटूंबातील कुठल्याही प्रसंगी आधी या ‘मी’ कडे लक्ष द्या असे तिला अपेक्षित असते. दोन्ही घरची जबाबदारी या कन्येवर असते. माहेरची मते तर हिने हेरली असतातच, सासरची मनेसुद्धा हिला ‘सर’ करायची असतात.

मुलगा हा घराण्याचा कुलदीपक असतो असे म्हणतात. पण बालक असलेल्या या मुलाला पुढे सुसंस्कारित करुन कुलदीपक बनविण्यात आई नामक सुनेचाच हात असतो. कारण ती उपजतच  आई असते.

बालपणी बाहुलीची आई बनण्यात ही मुलगी रंगुन जाते. तेव्हा मुलगा कधीच बाहुलीचा बाबा बनत नसतो.

स्वत: आई बनण्यासाठी हिला स्वत:च्या आई पासून दूर जाते लागते. नवर्‍याची आणि मुलांची भाऊबीज साजरी व्हावी म्हणून प्रसंगी हीच कन्या चंद्राला ओवाळून समाधान मानून घेते. भविष्यात ही कन्या वृद्ध सासू-सासर्‍यांनाच नाही तर प्रसंगी नवर्‍याला सुद्धा आईच्या मायेने सांभाळते.

म्हणूनच नविन घरकुलात ‘अर्धांगिनी’ बनुन पदार्पण करणार्‍या या सून नामक कन्येला इंग्रजीत नुसते आपल्या पतीची “Half”  नाही तर “Better Half ”  म्हणतात ! नाही.

Leave a comment