चैतन्य

ज्या उर्जेवर सृष्टीत, मानवात जीवंतपणा आहे की नाही हे तपासले जाते, त्या उर्जेला चेतना म्हणतात.

माणसाचे शरीर आहे. त्यामध्ये जोपर्यंत ही उर्जा आहे तो पर्यंत शरीर आपली विहीत कर्मे करीत असते.

हसणे, खेळणे, बोलणे, चालणे, पण ज्यावेळी ही उर्जा निघुन जाते, त्यावेळी त्याचे शरीर आहे तसे पडून रहाते, ना बोलत, ना हसतं, ना खेळत. तेव्हा मनुष्य प्राण्यामध्ये जिवंत असण्याची एकमात्र खुण म्हणजे चेतना (उर्जा).

माणसाप्रमाणे ही चेतना सृष्टीमध्ये पण दिसते. रात्रीचा गहन अंध:कार सकाळ होताच सूर्यकिरणांचे चेतनेमुळे हळू हळू नष्ट होतो.

अगदी पाने, फुले, पक्षी, कोकीळा या सर्वांमध्ये चेतना भरली जाते व प्रत्येक वस्तुत उर्जा दिसू लागते.

चैतन्य म्हणजे, सूर्याचे उगविणे, फुलांचं उमलणे, चिमुकल्यांचं हसणे ही चैतन्याची नवी पहाट होणे, कोकीळेचं कुंजन, पक्षांची किलबिल, नवा प्रकाश, नवी क्षितिजे, नवी आशा, नवा उमंग, सौंदर्यांचा अविष्कार, नितळ आनंदाचा अनमोल देत, सारं काही विलोभनीय सारं काही विलक्षण, आनंद सागरात डुंबणारं.

हवं हवंसं वाटणारं असे हे चैतन्य अशी उर्जा आपण परमेश्‍वराकडे मागायची असते. हा विषय समोर आल्यावर माझ्या डोळ्या समोर अनेक व्यक्ती उभ्या राहिल्या.

त्यांच्या प्रार्थनेतून उत्पन्न झालेली उर्जा (चैतन्य) यातून देशाची उभारणी झाली.

अशी चैतन्याची निर्मिती करणारी साधूसंत मंडळी पण नजरे समोर आली.

आपल्या नजीकचे म्हणजे ब्रम्हचैतन्य गोंदावलेकर महाराज, तसेच अनेक संतांची मांदियाळी समोर आली. या सर्व संतांनी भक्तांमध्ये चैतन्य उत्पन्न केले.

आषाढी-कार्तिकी या वारकर्‍यांचे अंगात उर्जा उत्पन्न होवून वारीने हे भक्तगण पंढरीला जाऊ लागले.

सकलजनामध्ये ही उर्जा पसरवण्याचे कार्य या वारीतून होत गेले.

या यादीमध्ये काही नामोल्लेख करायचा झाला तर योगी रामकृष्ण परमहंस, योगी विवेकानंद, पु. ल. देशपांडे, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, वि. दा. सावरकर, डॉ. अब्दुल कलाम, लोकमान्य टिळक, वि. स. खांडेकर, आचार्य अत्रे, सर्वपल्ली राधाकृष्णन, मदर तेरेसा, विश्‍वेश्‍वरय्या, रविंद्रनाथ टागोर, शांता शेळके, पंडीत जवाहरलाल नेहरु, महात्मा फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, ग. दी. माडगुळकर, संत गाडगेबाबा, बॅरिस्टर पी. जी. पाटील, कोरेगावचे अप्पासाहेब कुलकर्णी व अनेक थोर मंडळी यांनी निस्तेज झालेल्या देशात चैतन्य भरले.

महात्मा गांधी यांनी या चैतन्यातून विनाशस्त्र देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशक्य ते शक्य करुन दाखविले.

तेव्हा या चैतन्याची ज्योत प्रत्येकाने आपल्या ह्रदयात तेवत ठेवली पाहिजे व त्या प्रकाशात मानवतेचे दर्शन घेत गेले पाहिजे.

ही भारतीय भूमाता जगाची चैतन्य भूमि आहे. ती तेजोमय ठेवणे, प्रेमाचे, भक्तीचे तेल सतत त्या ज्योतीत घालणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, ते करावे ही प्रार्थना.

Leave a comment