ऐरणीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही. हे गुरुजींचे शब्द मला पदोपदी आठवतात. ज्या ज्या वेळी संकटे येतात, अडचणी उभ्या रहातात, भयानक संकटांचे घाव ह्रदयावर होतात, तेव्हा गुरुजींचे शब्द मला आठवतात.
ऐरणीच्या घावानंतर देव पण येते खरचं आहे.
प्रपंचात प्रत्येकाला ऐरणीवर चढावे लागते. अग्नीपरीक्षा द्यावी लागते. त्या ऐरणीवर चढल्यावर ते घाव जो सोसतो त्याच्या जीवनाला आकार येतो.
त्याचे सोने उजळून निघते. तो दृष्टा पुरुष होतो. जगापुढे आदर्श म्हणून मानला जातो.
जर तुम्हाला परमात्म्याकडे वाटचाल करावयाची असेल तर तुमच्या ह्रदयाचे ऐरणीवर संकटांचे घण घालून पहा. ते घण सोसणे म्हणजे देवपणाकडे जाणे होय. तापलेल्या लोखंडाचे गोळ्यावर घणाचे घाव घालताच तो गोळा भंग पावतो. त्यातून ठिणग्या ठिणग्या पडत, उजळत नृत्य करीत बाहेर पडतात.
हे नृत्य साहस केवळ ऐरणीच्यावर असलेला लोखंडी गोळाच करु शकतो.
कितीही संकटे आली, आरोप, प्रत्यारोप झाले तरी जो डगमगत नाही, स्थितप्रज्ञाप्रमाणे रहातो, उजळ माथ्याने उभा रहातो, तोच हिर्याची चमक संपादन करु शकतो.
अशा या ऐरणीवर आयुष्यात आपणास एकदा तरी चढायचे आहे हे आपण लक्षांत घेतले पाहिजे. ऐरणीची भिती घेवून गंजत पडायचे नाही तर तापून घनाचे ठोके खाऊन लोखंडाची अरी बनायचे आहे. ती अरी लेवून बैलगाडीचे चाक शेतातून फिरवायचे आहे व शेतातून जीवनाची संपत्ती समृद्धी घरी आणायची आहे.
शेतकर्यांस या ऐरणीची चांगली प्रचिती येते.
परमार्थात पण आपण आराध्य देवतेला विसरतो. तिच्याकडे दूर्लक्ष करतो. पण संकट येताच आपण तिची आठवण काढतो.
त्यावेळी आपल्या विसराचे आघात सोसून ती देवता आपल्या मदतीस करुणा भाकीत धावून येते.
म्हणून आपण कृतार्थ भावनेने तिला देवपण देवून नमस्कार करतो.
ऐरणीवर असलेल्या सोन्यावर किती जरी घाव घातले तरी ती ऐरण सुंदर हिर्याचा दागिनाच आपणास प्रदान करते.
टाकीचे घाव सोसत सोसत देवपण येते, ते या ऐरणीतूनच.
तेव्हा प्रपंचातपण आपण ऐरणी प्रमाणे असावे कोणीही येवून त्यावर घण घालीत राहिला तरी आपली वृत्ती मात्र त्या घावातून सुंदर कलाकृती किंवा चांगला भावच निर्माण करेल.
त्यातून सोन्याचे किंवा लोखंडाचे तेज जगा समोर येईल.
कोणीही केव्हाही या ऐरणीवर घण घाला ती ऐरण घण सोसून सौदर्यवान धातुचे तेजपुंज अलंकार तुम्हाला प्रदान करेल व ऐरणीने दिलेला हा हिर्याचा हार तुम्हाला शोभायमान करेल.
अशा या ऐरणीवर प्रत्येकाने चढून घणाचे घाव सोसून मौल्यवान अलंकाराचे जीवन इतरांना बनवून द्यावे, हीच अपेक्षा.
1 Comment
Anonymous
Khup chan 👌