मानवी जीवनात काय किंवा सृष्टीत काय आपण वेगळ्या वेगळ्या साठ्यांकडे पहातो.
माणसाची प्रवृत्तीच साठे करुन ठेवण्याची असते. दिसली वस्तु – घेतली, साठवून ठेवली असे साठ्याचे स्वरुप असते.
त्यामुळे तो साठा उपयोगी आहे का अनुपयोगी आहे याचा विचार होत नाही. तेथे हे साठे अडगळ म्हणून पाहिले जातात.
तेव्हा विवेकी माणसाने साठ्याकडे कसे पहावे याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
माणसाचे हातून चांगली वाईट कर्मे सतत होतच असतात. चांगल्या कर्माचा साठा एका बाजुला केला जातो तर वाईट कर्माचे साठवण दुसरीकडे केली जाते असे हे चक्र सतत चालू असते ते आपण पाहू शकत नाही. मात्र त्याचे परीणाम जीवनात आपणास पहावयास मिळतात.
प्रपंचात ज्यावेळी सर्व बाजुनी प्रगती होत असते. यश प्राप्त होत असते तेथे त्याचे पुण्याईच्या साठ्याकडे सर्वांचे लक्ष जाते.
लोक म्हणतात पूर्व पुण्याई मुळे त्याची गोष्ट साध्य झाली. त्याच्या नुसत्या प्रयत्नाला असे यश कधी मिळाले नसते येथे पुण्याईचा साठा समोर येतो.
विवेकी माणूस प्रपंचात काय चांगले, काय योग्य, काय सर्वांचे हिताचे आहे याचे चिंतन करतो व त्या चिंतनातून त्याला नजरेस येतील त्या गोष्टीचा तो साठा करणेस सुरवात करतो.
त्याचेजवळ चांगल्या विचारांची खाण असते. त्याचा सर्वाभूति समाधान हा भाव वाढत असतो तो धीर गंभीर असतो. त्याला तो साठा कुणाला दाखविण्याची घाई नसते. असा अथांग साठा असणार्या माणसाच्या जीवनात पुण्याईच पुण्याई जन्म घेते. तो माणूस पुण्याईचे रांजण भरभरुन ठेवतो.
एक दिवस त्या साठ्यांना किंमत येते भाव वाढतो व त्याचे जीवनच बदलून जाते. साठवणूक ही चांगली गोष्ट आहे. पण ती कोणत्या गोष्टीची करावयाची किती करावयाची हा विवेक असणे गरजेचे आहे.
या साठवणूकीला पण मर्यादा असते ती मर्यादा लक्षात घेणे विवेकी माणसाचे काम आहे.
अशा साठवणूकीत आपण प्रपंची माणसे पैशाची साठवणूक करतो.
तो साठविलेला पैसा पुरुन ठेवतो, तो इतका पुरुन ठेवतो की एक दिवस तो पुरलेला पैसा त्या माणसालाच पुरतो त्याचा नाश करतो. त्याचीच मुले बाळे संपत्ती त्या साठ्या साठी एकमेकांचे वैरी होतात त्यांचा पुण्याईचा साठा विलयास जातो.
येथे लक्षात येते पुण्याईचा साठा असला तरी तो कधी, कुणासाठी वापरायचा याचा विचार करणे गरजेचे आहे. साठ्यातून अहंकार निर्माण होतो तो होऊ नये म्हणून तो साठा रक्षण करण्यासाठी काम, क्रोध, मोह, माया या शत्रुंना थांबविण्यासाठी रक्षक उभे करणे गरजेचे आहे.
ते नसतील तर हे चोर सर्वसाठा पळवून नेतील व आपली प्रपंचात फजिती होईल ही होवू नये म्हणून साधु संत महंत यांची संगत असणे गरजेचे आहे.
ते या पुण्याईच्या साठ्याला चांगले संरक्षण देवू शकतात. म्हणूनच म्हंटले आहे.
साधु संत येती घरा तोची सण मोठा.
असा हा पुण्याईचा ठेवा प्रपंचात आपण जतन करुन ठेवूया.
आनंदी जीवन जगु या.
1 Comment
सौ. शीला केतकर
खरोखर माणसाने कितीही प्रयत्न केले. तरी पूर्व पुण्याई असेल, आणि पूर्व पुण्याईचा साठा असेल तरच त्या प्रयत्नांना यश येते.
पण बाकीचे साठे करण्यापेक्षा सत्कर्माचे साठे करणे हेच महत्त्वाचे आहे.
🙏 राम कृष्ण हरी🙏