आधार याचा अर्थ टेकू, खंबीर पाया. या आधारावर शंभर मजली इमारत उभी रहाते. जगातील अतीभव्य अशी संरक्षक भिंत उभी रहाते. तसेच अशा आधारावर कर्तुत्वपणाचे व्यक्तीमत्व समोर येते.
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ! असे म्हणणारे संत यांचे मुळे लाखो साधकांची वारी पुढे चालली आहे.
प्रपंचात आपण पहातो, मूल चालताना प्रथम आईच्या हाताचा आधार घेते व तो खंबीर आहे हे लक्षात येताच आत्मविश्वासाने चालू लागते. येथे आधार महत्वाचा आहे.
जीवनात आधाराची धार मनांत ठेवून माणूस वागत असतो. त्या धारेने कुणाला जखमी न होवू देता इष्ट कर्म साधण्याचा प्रयत्न केला जातो.
आधार हा देश पातळीवर महत्वाचा वाटतो. आधार कार्ड पहाताच मी या देशाचा नागरिक आहे. माझ्या अडचणीला माझा देश माझ्या पाठीशी आहे, माझी संस्कृती, मानवता मला मदत करेल हा आधार या आधार कार्डातून मिळतो. तेथे गरीबा पासून श्रीमंता पर्यंत तूच मला खरा आधार हे वचन सत्य वाटते.
बुडत्याला काडीचा आधार वाटतो. नुसत्या काडीच्या आधारावर मनुष्य तरु शकतो. मग एखाद्या अडचणीत असणार्या माणसाला गोड शब्दाचा सहानुभुतीचा, मदतीचा आधार का वाटणार नाही?
प्रपंचातील हे आधार महत्वाचे आहेतच, पण असे आधार घेत घेत प्रपंचातून परमार्थात पदार्पण करीत असणार्या साधकाला साधू संताचे आधार फार मोठेे वाटतात.
त्या आधारावर अध्यात्माची प्रगती होत जाते. त्याच आधारावर मनातील भिती नष्ट होते. तोच आधार राग, द्वेष या विकारापासून माणसाला मुक्त करतो व स्वच्छंदी जीवन जगण्याची प्रेरणा देतो.
असे आधार घेत घेत एक दिवस असा उगवतो, तेथे परमेश्वर दर्शन देतो.
आपण विनम्र होतो व मुखातून एकच वचन बाहेर पडते ‘तूच मला खरा आधार, देव तूच खरा आधार’.