साधने मध्ये सावधानता

प्रत्येक माणूस कर्म करीतच असतो. त्यामध्ये कधी खंड पडत नाही. काही कर्मे चांगली असतात, काही वाईट.

चांगले कर्म झाले की त्याची स्तुती सुरु होते. ती स्तुती ऐकून त्याला अहंकार उत्पन्न होतो व आपण काही वेगळेच आहोत, जगापेक्षा श्रेेष्ठ आहोत असे वाटू लागते.

या अवस्थेमध्ये त्याला हरभर्‍याच्या झाडावर चढविले जाते. तेथे त्याची सावधानता भंग पावते तो उंच शिखराहून खाली कोसळतो.

तेव्हा सावधानता हा गुण साधकाने लक्षात घेण्यासारखा आहे. तुम्ही कर्म करीत जा पण कर्म आपल्यापाशी साठवून ठेवू नका. ते परमेश्‍वराला अर्पण करा, म्हणजे त्याचे कर्तुत्व स्वत:कडे येत नाही व साधनेचा अहंकार स्वत:कडे येत नाही.

त्यामुळे उंच शिखरावरुन खाली लोटला जाण्याची शक्यता रहात नाही. ही साधनेतील सावधानतेची पहिली पायरी होय.

कर्म करीत असताना कोठे थांबायचे हे ज्ञान साधकाला असले पाहिजे. त्याला चिंतनाची गरज असते. विवेकाची जोड असावी लागते.

तेव्हा साधना करीत असताना कोठे ब्रेक लावायचा ? कोठे गाडी वळवायची ? कोठे मागे घ्यायची ? याचे ध्यान साधकाला असणे गरजेचे आहे.

नुसते कर्म करीत गेला की कोठे धोका होईल ? याचा नियम नाही. तेव्हा साध्याचे ज्ञान त्याचा परिचय व त्याप्रमाणे आचरण या गोेष्टी महत्वाच्या आहेत.

साधना करीत असताना मार्गामधील अडचणी साधकाने चिंतनाने ध्यानात घेवून मार्गाचे मार्गदर्शन केले पाहिजे. अवघड वाट सोपी केली पाहिजे. साधकाचे लक्षाकडे सतत ध्यान असले पाहिजे.

अशी जागृत माणसे, साधक सावधपणा ठेवून जीवनांत यशाची शिखरे संपादित करतात.

ही सावधानता राखण्यासाठी फक्त बीजाक्षरी मंत्र उपयोगाचा आहे.

तो म्हणजे, साधनाचे सार-मंत्र-बीजाक्षरी ‘राम’.

राम नामाचा मंत्र तुमच्या साधनेला यश देईल.

Leave a comment