पुतळा हा स्थैर्याचे प्रतिक आहे.
लहानपणी आम्ही अंगणात हा खेळ खेळायचो. एक गडी असे व त्याचे सर्व सवंगडी त्याचे भोवती फेर्या मारीत असत. तो ज्या सवंगड्याचे नांव घेईल. त्याने असेल त्या ठिकाणी स्तब्ध होऊन उभे रहावयाचे असतो. तो गडी जोपर्यंत त्याला सुटका देत नाही तो पर्यंत त्याच भावामध्ये त्याने उभे रहावयाचे असते. ज्या अवस्थेमध्ये आहे त्या अवस्थेतच त्याला उभे रहावे लागते.
प्रपंचात वागताना मला राहून राहून हीच जाणीव होते आहे.
परमेश्वर आपल्याबरोबर हाच खेळ खेळत आहे. तो आपणाला सूचना देत आहे. तो ज्यावेळी तू स्थिर खंबिर राहा अशी सूचना देता, तेव्हा आपण भक्तीने भावयुक्त अंत:करणाने त्याचे ठाई स्थिर झाले पाहिजे. त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये.
प्रपंचातून मी ज्यावेळी परमार्थात प्रवेश करीत हा खेळ खेळण्यास सुरुवात करीन त्यावेळी देवा, तू मला पुतळा बनव, मला निर्मोही कर, मी स्थिर व गंभीर भावाने एका ठिकाणी तुझ्या भक्तीतलीन होईन. हा त्यामागचा भाव असतो.
पुतळा ही वैराग्याची कसोटी आहे. या पुतळ्यामध्ये सात्विक वैराग्य असते.
कोणी वंदा , कोणी निंदा स्थिर राहाणे आमचा धंदा.
निरनिराळ्या गावामध्ये आपण जातो तिथे ठिकठिकाणी पुतळे दिसतात. कांही विशिष्ट व्यक्तींचे पुतळे असतात. त्या गावांत त्या ठिकाणी तेथील लोकांचे मनामध्ये त्या व्यक्ती बद्दल कृतज्ञता भाव असतो. त्या व्यक्तीच्या उपकाराची जाणीव व्हावी, हा त्यापाठीमागचा भाव असतो.
वर्षानुवर्षे एकाच मुद्रेमध्ये (भावात) रहाणार्या या पुतळ्यातून भक्त गणांना हेच सांगयचे असते. महाजन हो तुमची किर्ती अबाधित आहे. ती तशी वर्षानुवर्षे राहो तुमची आठवण अखंड राहो.
अशा या जगात कांही चांगल्या गोष्टीबरोबर कांही वाईट घटनापण घडत असतात. तेथे राजकारण येते.
राजकारण करण्याचे साधन म्हणून पुतळ्याचा उपयोग केला जातो. जो राजकीय पक्ष सत्तेत असतो तो पुतळ्याची स्थापना करतो. मात्र कांही विद्रोही पक्ष त्याच पुतळ्याचा चपाळांचे हार घालून, त्यांचे तोंड काळे करुन पुतळ्याची तोडफोड करतात. हा विरोधकांचा पवित्रा असतो.
येथे पुतळा मात्र स्थिर गंभीर असतो. त्याचा काही प्रतिक्रीया नसते.
कोणी वंदा कोणी निंदा स्थिर रहाणे आमचा धंदा या न्यायाने असे पुतळे ऊन, वारा, विरोधाचा छळ सोसून उभे असतात व शांतपणे आपल्या ध्येयाकडे पहात असतात.
तात्पर्य काय? पुतळ्याप्रमाणे ऊन, वारा, पाऊस यामध्ये साधकाने स्थिर भावाने राहिले पाहिजे. विरोध व अनुकुलता यामध्ये समभाव ठेवून रहाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
जैन धर्मामध्ये पण श्रावकांनी पुतळ्याप्रमाणे प्रपंचात स्थिर रहाण्याचा उपदेश केला आहे. पुढे म्हटले आहे जैन धर्मात स्नानाशिवाय, आहाराशिवाय, मौल्यवान अलंकाराशिवाय तुम्ही मजेत जीवन जगू शकता. मग उगीच ही धावपळ का?
स्थिर रहा, उच्च ध्येय पहा त्याकडे लक्ष ठेवून भक्तीने, प्रेमाने ध्येयाप्रत जाण्याचा प्रयत्न करा. तुमचा प्रयत्न तुम्हाला यशस्वी करेल. गरज आहे भावनेची. त्यांच्या (परमेश्वराचे) आज्ञेत रहाण्याची.
जो त्याची आज्ञा शिरसावंद करील त्याचे जीवन आनंदी होईल, समाधानी होईल.