प्रेम

प्रेम म्हणजे काय?

याचा उलगडा करावा म्हणून आज मी विचार करु लागलो.

प्रेमामध्ये पण द्वैतभाव आहे. निस्वार्थी प्रेम व स्वार्थी प्रेम.

पण मानवी जीवनात एकत्र येण्यासाठी प्रेमाचा धागा असणे गरजेचे आहे.

निस्वार्थी प्रेमाची कल्पना करताना माझे समोर एक कविता आली.

ती अशी –
प्रेम स्वरुप आई, वात्सत्य सिंधु आई, बोलावू तुज आता मी कोणत्या उपायी!

अक्षरश: निस्वार्थी प्रेमाची प्रतिमा समोर उभी राहिली. या ठिकाणी प्रेमाचे धाग्यात बालक व आई गुंफले गेले.

बालकाला शिक्षण घेणेसाठी गुरुजनांचे स्वाधीन करावे लागते. तेथे गुरुशिष्याच्या धाग्यामध्ये त्यांची जोडणी होते.

जसा जसा साधक मोठा होतो, वयात येतो, प्रपंचात वावरु लागतो तसे त्याला व त्याला सोबत करणार्‍या वधूस मंगळसूत्राचे धाग्यात गुंफले जाते.

तेथे पण प्रेम हाच मुख्य धागा असतो. जिथे हा धागा कमजोर दोर्‍यांनी गुंफला जातो, तेथे तलाक होतात.

येथे पण स्वार्थी प्रेम व निस्वार्थी प्रेम याची उजळणी होते.
हेच प्रेम प्रपंचात अनेक ठिकाणी पहावयास मिळते.

जसे दूधामध्ये साखर, भाजी मध्ये मीठ, प्रपंचात शिस्त व जेवणात रुची यावी असे वाटत असेल तर त्यांनी एकत्र एका प्रेमाच्या धाग्यात गुंतवून घेणे गरजेचे आहे.

या प्रेमाला पैशाची गरज नाही. गरीबा घरची शिळी भाकरी व लोणचे जर प्रेमाने खाल्ले तर माणूस तृप्त होवून जातो. तेव्हा प्रेम हा महत्वाचा धागा आपण हातात ठेवायचा .

चौर्‍याऐंशी लाख योनीतून प्रवास करत हा प्रेमाचा धागा (मनुष्यजन्म) आपणास लाभला आहे. जन्म व मृत्यू ही त्या धाग्याची दोन टोके आहेत. त्या धाग्यामध्ये तुम्हाला आनंदी जीवनाची अनेक फुले गुंफायची आहेत व त्या गुंफलेल्या हाराला, ज्याने आपणास प्रेम दिले, सद्बुद्धी दिली त्या परमेश्‍वरास अर्पण करावयाचा आहे.

ज्याने जे दिले त्यालाच ते परत करावयाचे. त्याचेवर मोह ठेवायचा नाही, मात्र पेमाचा धागा तुटू द्यायचा नाही हे सूत्र ध्यानात ठेवायचे .

अशा या प्रेमाच्या धाग्यात अनेक वस्तू, अनेक माणसं आपण जोडतो. पण आपण त्याला चिटकून रहातो. त्यांची साथ न कळत सोडायची असते. हे आपण विसरतो व तेथे दु:ख प्राप्त होते.

तेथे प्रपंचातील प्रेमाचा धागा अलगत परमार्थाकडे न्यावयाचा असतो व तो गुंफलेला प्रापंचिक धागा – हरिला (परमेश्‍वराला) अर्पण करायवाचा असतो.

प्रेमाने दिलेले, गरजेच्यावेळी दिलेले, तर्‍हेच्या वेळी दिलेले कपभर दूध, त्याची किंमत, वेळ येता, मोठा होता, मोठे ऑपरेशन करुन लाखो रुपयांचे बिल माफ करण्यात होते.

हे प्रेम व प्रेमाची ओळख असते तेव्हा प्रेम करा, प्रेम द्या, वेळ द्या.

Leave a comment