परिवर्तन… बदल हा निसर्गाचा सृष्टीचा नियम आहे.
त्याप्रमाणे निसर्गात काय किंवा मानवात काय, क्षणाक्षणाला परिवर्तन घडत असते.
या परिवर्तनाचे पण दोन प्रकार आहेत.
एक दृष्य परिवर्तन व एक अदृष्य परिवर्तन. म्हणजेच आत्मपरिवर्तन व बाह्यपरिवर्तन.
मनुष्य जन्म होतो तेथून परिवर्तनाची सुरवात होते. दिवस जसे जातात, त्याची वाढ म्हणजे परिवर्तन होत असते. हे दृष्य परिवर्तन होय.
पण हे परिवर्तन होताना आपणास दिसत नाही. उंची, वय, शरीर वाढल्यानंतर त्यांची अनुभूती येते.
शरीरात होणार्या या अदृष्य परिवर्तनात बरोबर मनांत पण कांही परिवर्तने घडत असतात. ती सहजीवनाला धरुन असतात.
बालकाला सहजीवनातून आई बद्दल प्रेम वाटते. आईची आठवण होते.
जसा जसा माणूस प्रपंचात उतरतो तसे तसे त्यांचे प्रापंचिक परिवर्तन घडत जाते. तेथे आईच्या ठिकाणी पत्नी येते, तिच्या सहकार्याने प्रपंच चालू होतो. प्रपंचाची जुळणी होते.
एकाचे दुसर्यात रुपांतर होते. मुले बाळे होतात. हा प्रपंचातील परिवर्तनाचा काळ असतो.
त्या लेकरांची काळजी, शिक्षण, संगोपण यात तो गुंतून जातो. त्या कष्टाला फळ येते. पानाचे फळात परिवर्तन होते.
मुले मोठी होतात, निरनिराळ्या क्षेत्रांत यश प्राप्त करतात. समाजात मान सन्मान होतो. लोकांना आपला आधार वाटतो.
हा पण एक परिवर्तनाचाच प्रकार असतो.
आयुष्याचे तिसर्या टप्याला आपण केव्हा जेष्ठ नागरीक झालो हे कळत नाही.
तेथे आपली परिवर्तनाची सर्व क्षेत्रे स्तंभित होतात.
तेथे मनात विचार येतो थांबण्याचा, शांतपणे चिंतन मनन करण्याचा. प्रपंचातून परमार्थात जाण्याचा. या ठिकाणी जो थांबतो तो प्रपंचाच्या गाडीच्या चालक होतो.
त्याने आपली सर्व आसक्ती वेगमर्यदा सर्व आपल्या मुठीत ठेवलेली असते. त्या ब्रेकचा उपयोग करुन तो पुढील वाटचाल करीत असतो. त्याचे जीवन आता पिकल्या पानाप्रमाणे परिवर्तीत झाले असते.
तो आता फुले फळे देवू शकत नाही म्हणून तो निरुपयोगी होत नाही. तर त्याची सावली काबाड कष्ट करण्याला शांती देवू शकते.
हे प्रापंचिकांतील परिवर्तन फार गरजेचे आहे.
परिवर्तनाला गरज आहे. चिंतनाची, विवेकाची.
त्या विवेकातून साधक दगडातून देवाची मुर्ती साकार करु शकतो. लोखंडाचे सोने करु शकतो. पाय ठेवील तेथे पाणी काढू शकतो.
आपण परिवर्तनशील बनुया, जीवन आनंदी बनवू या.