प्रपंचामध्ये गरिबी, श्रीमंती या गोष्टी सतत समोर येतात. कष्टकरी, घाम गाळणारा, शेतात उन्हातान्हात काम करणारा, कसे तरी पोट भरणारा, दोन वेळ जेवायला मिळेल एवढे कमविणारा, रात्री झोपेसाठी थांबा मिळेल तेथे निवारा घेणारा पण शांतपणे झोपणारा असा माणूस पाहिला की गरिबीची कल्पना समोर येते.
त्याला गरिबीची लाज नसते. त्याच्या मनांत श्रीमंतीबद्दल प्रेम असते. तो श्रीमंताशी नम्रपणे वागत असतो. त्याच्या तराजुमध्ये एका बाजूला भयाण आर्थिक गरीबी असते तर दुसर्या तराजूत प्रेम, भक्ती पडत असते. त्यातून त्याची मानवता दिसून येते.
दुसरी बाजू श्रीमंताची : त्याच्या नशिबी सर्व सिद्धी येतात. त्याला अफाट पैसा, संपत्ती मिळत असते. त्याला या गरीबांकडे पहाण्याला वेळही नसतो. त्याचे मनांत मानवतेचा र्हास होत असतो. तो कधी गोरगरीबांच्या अडचणी लक्षात घेत नाही. किंवा नडलेल्यांना मदत करीत नाही. त्याची पैशाची श्रीमंती काही कामाची नाही.
पण खिशात उद्याचे पोट भरण्या इतके पैसे नसणारा गरीब आपल्या जेवणातील अर्धी भाकरी काढून भुकेल्याला देतो.
तो गरीब श्रीमंताहून श्रीमंत म्हणावा लागेल. तेथे त्याची पैशाची श्रीमंती नसते तर मानवतेची श्रीमंती असते, मनाची श्रीमंती असते.
हा मानवता वाद जो ध्यानात घेतो, मानवतेचा भाव ह्रदयात ठेऊन इतरांना, गरजूंना मदत करतो तो खरा श्रीमंत होय.
हीच ती मनाची श्रीमंती सर्वांच्या ठाई रुजो व त्या मनाच्या श्रीमंतीने सारे जग चैतन्यमय होवो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना.