माँ म्हणजे माता – आई – जननी – जन्मदाती.
या माँ शब्दात मोठी ताकद आहे, हा शब्दच फार सुंदर आहे.
आनंदाने हृदय भरुन आले की तोंडातून माँ शब्द बाहेर पडतो, तिच्या गोड शब्दातून डोळ्यातून गंगा जमुना प्रकट होतात.
जगामध्ये ज्याला अंत नाही त्याला आसमाँ म्हणतात (आकाश) व जिच्या प्रेमाला अंत नाही तिला माँ म्हणतात.
जी हिमालयासारखी भव्य, उंच आहे पण कठोर नाही. ती माँ होय.
ती समुद्रा सारखी गुढ (खोल) आहे पण ती समुद्रा सारखी खारट नाही.
माँ वार्यासारखी चंचल प्रेमळ आहे. पण ती सतत आपल्या बरोबर आहे.
तिचे दर्शन आपणाला केव्हाही घेता येते.
माँ परमेश्वरा सारखी महान आहे. आपल्यासाठी तिची सतत मदतीची साथ आहे.
अशा या आईची उपमा आपण कुणाला देऊ शकत नाही. याला कारण प्रत्येकाला दुसरी आई असतं नाही.
तेंव्हा आई ही अजोड, सर्वश्रेष्ठ दैवत आहे. ब्रम्हा – विष्णु – महेश हे जगाची निर्मिती, पालन पोषण व संहार करतात तर माँ या जगात या तिघांचे काम एकटी करते.
एका मातेच्या पुजनात सर्व देव देवताचे पूजन होते.
माँ मध्ये ममतेचे महाकाव्य साठविले आहे.
माँ म्हणजे संस्काराची पाठशाला.
मातेच्या कुशीत असलेल्या बालकाला स्वर्ग सुखाचाच भास होतो. तिच्या कुशीतच त्याला प्रेमाचा खजीना सापडतो.
ती जेव्हा आपणापासून दूर असते तेव्हा ती आशिर्वाद रुपाने आपल्यावर तो खजीना उधळत असते.
परमेश्वराला पण प्रत्येक घरात प्रवेश हवा होता म्हणून मातेच्या रुपाने तो त्याने प्राप्त केला.
या कलीयुगात जेथे गर्भपाताने थैमान घातले आहे तेथे आपणास सुरक्षित जन्म दिला हे मातेचे उपकार आपण कधी फेडू शकणार नाही.
आपल्या लहानपणी जिने आपल्याला हात धरुन चालविले. आज आपण तिला हात देवून आधार दिला पाहिजे.
मातेच्या आशिर्वादाचा खजिना मिळविणेसाठी प्रभात काळी आई-वडिलांना नमस्कार करुया.
त्यांची सेवा चाकरी करण्याने त्यांना जी शांत झोप लागेल हीच आपली दिवाळी समजावी.
वर्षातून एकदा तरी माता पित्यांना तिर्थयात्रेस घेऊन जा.
बायको आपण आपल्या पसंतीची आणतो माता मात्र आपल्या पुण्याईने मिळते.
परमेश्वराने आपले रुप पहाण्यासाठी आरशा सारखे माता-पिता निर्माण केले आहेत.
परमेश्वर आपले रुप त्यांत रोज पहात असतो. ज्या मूर्तिची घडण आपण केली आहे. तिची आपण रोज पूजा करतो. मग त्या मातेने आपणास निर्माण केले आहे. तिची पूजा आपण रोज कां करु नये ?
आपला भाग्योदय होण्यासाठी दररोज मातेचया पदकमलांची धूळ मस्तकाला लावा.
आई-वडीलांचे आज्ञेत राहणे हीच त्यांची सेवा होय.
शेवटी असं म्हणावे वाटतं…
हे माँ तेरी सुरतसे अलग
भगवान की सूरत क्या होगी ।
हे माँ तुला कोटी कोटी प्रणाम ।