माणूस जीवनात खूप कष्ट करुन करुन काही गोष्टी मिळवितो. पण त्या मिळविलेल्या गोष्टींचा आनंद घेण्यापूर्वीच नशीब सावकार म्हणून पुढे उभे रहाते व सर्व कमाई जप्त करुन टाकते.
तेथे म्हणावं वाटतं, कष्टानं मिळविले पण नशिबाने नेले.
कुणी म्हणेल असं कुठं असतं का राव, पण मी म्हणतो हेच आहे प्रारब्ध किंवा नशीब.
चौर्याऐंशी लक्ष योनीच्या कष्टप्राय प्रवासा नंतर मनुष्य जन्म मिळतो. पण त्या जन्मातून मोक्ष हा अश्या नाशिबवानांनाच मिळू शकतो, ज्याचे पाठीमागे पुण्याचा साठा आहे.
परमेश्वराने अनेक विचार असलेले मन आपणास दिले आहे व मनुष्य जातीत जन्म घेतल्यावर परमेश्वरच आपणास म्हणतो आहे, आता विचारांना आवर घाला.
माझे मनन चिंतन करा. कष्टाने मिळविलेले अनेक विचार कसे आवरायचे? तेथे पण नाशीब उभे रहाते.
पण त्या मिळविलेल्या विचारावर ताबा मिळविला तर म्हणता येईल प्रारब्ध श्रेष्ठ.
परमेश्वराने मोठ्या कष्टाने, काहीही मोबदला न घेता दोन डोळे आपणास दिले आहेत. आपण मात्र त्या सुंदर डोळ्यांनी फक्त सृष्टीचे सौंदर्यच पहात राहिलो. तेव्हा असे वाटते या डोळ्यांनी तुझ्यातील असलेलं सौदर्य पहावे.
नाना प्रकारचे पदार्थांची चव चाखण्यासाठी एक रसना परमेश्वराने आपणास दिली आहे. परमेश्वरा पण तु आता असं म्हणतोस अन्नावर वासना ठेवू नकोस.
जन्मापासून इतक्या नातेवाईकांबरोबर संबंध वाढविले आणि आता या शेवटच्या टप्यात परमेश्वरा तु म्हणतो ही सर्व नाती खोटी आहेत.
तेव्हा वाटते कष्टाने मिळविलेली नाती नशीबाने दूर नेली.
प्रपंचात प्रेमाने आपण नात्याचा गुंता वाढवितो, मात्र आयुष्याच्या तिसर्या टप्यावर आल्यावर परमेश्वर म्हणतो हा गुंता सोडवित बसणे व्यर्थ आहे. तेव्हा या गुंत्याचा विचार करु नकोस.
प्रापंचाच्या रगाड्यात आपण पूर्ण अडकून जातो पण आयुष्याच्या तिसऱ्या टप्प्यात परमेश्वर आपणास सांगतो – शांत रहा ,ध्यान करा.
अशी फसगत होते तेंव्हा विचार कर – प्रपंच्यात गुंतायचे , का प्रापंचातुन मुक्त व्हायचे ?
मोक्ष म्हणजे चेष्टा नव्हे. मोक्ष म्हणजे मेजवनीने भरलेले ताट समोर ठेवून उपवास करायला प्रवृत्त होणे हे होय.
हे सर्व परमेश्वरा, तू वर बसून पाहत आहेस, आमची गंमत तू पाहत आहेस. आमच्या पाप पुण्याचा हिशोब तुझ्या समोर आहे.
तेंव्हा या पामराने केलेल्या कष्टाचे चीज होईल का नाही हे मला माहिती नाही, मात्र मी जाणतो फळाची अपेक्षा न करता कर्म कर प्रारब्धाने तुला त्याचे फळ मिळेल.
हे फळ मिळण्यासाठी परमेश्वर कृपाच गरजेची असते व ती कृपा आपल्यावर होवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.
आयुष्याच्या शेवटी अशी वेळ येउ नये ” कष्टाने मिळवले – नशिबाने नेले.”
नशिबावर मात करून ते टिकवणे आपल्यास जमले पाहिजे.