प्रपंचात जेष्ठता येणे ही श्रेेष्ठतेची खुण आहे.
बालकाला छोटा शिशु, मोठा शिशु, प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक, कला, विज्ञान, व्यापार यामध्ये शिक्षण घेत घेत या शिक्षणाचे जे उच्च ठिकाण विद्यापीठ त्यामध्ये प्रवेश करावा लागतो.
तेथे त्याला जगात झालेली प्रगती व त्याचा आढावा घेत नवीन करावयाची उन्नत्ती याचा विचार करावयाचा असतो. तेथे त्या त्या शाखेमध्ये विद्याविभुषित व्हावयाचे असते. अशी विद्याविभुषित करणारी विद्यापीठे फार थोडी असतात. त्यातून बाहेर पडणार्या विद्यार्थ्याला समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त होते.
याचप्रमाणे प्रपंचात पण बालक घरच्या वातावरणामध्ये काही संस्कार घेत घेत बालक अवस्था, विद्यार्थी-कॉलेज जीवन, प्रापंचिक प्रवास करीत करीत प्रपंचाच्या तावडीतून तावून सुलाखून बाहेर पडतो.
तो पर्यंत आयुष्याची तिसरी पायरी त्याने गाठलेली असते. ही त्याची जेष्ठतेची श्रेष्ठ पातळी समजली जाते.
तेथे आयुष्यातील निरनिराळ्या प्रसंगी कसे वागायचे ? कसे ठाम रहावयाचे? कुठे माघार घ्यायची? व सरशी कशी संपादन करायवाची? हे सर्व जेष्ठांनी शिकून घेतले असते.
त्यांच्या जवळ या संस्काराचे भांडार असते.
घरात असलेली ही जेेष्ठ मंडळी म्हणजे आजी-आजोबा यांचे ताब्यात जेव्हा बालके, तरुण, प्रापंचिक येतात त्यावेळी नकळत जेष्ठ मंडळींचे आचरण, वागणूक पाहून या तरुणांचे मनावर चांगले संस्कार उमटतात.
ते बारीक लक्ष ठेऊन त्या संस्कारावर आपल्या जीवनाची जडणघडण करतात.
तेव्हा विद्यापिठात होणारे संस्कार घरबसल्या या तरुणांवर होतात.
तेव्हा जेष्ठ नागरीक हे प्रपंचात संस्काराचे विद्यापीठ आहेत. हे म्हणणे पटते. त्यांना तो मान देऊन तरुणांनी आपली प्रगती करावी.