एखादी गोष्ट प्राप्त करावयाची असेल तर त्यासाठी अनेक मार्ग अवलंबीले जातात. जसे चांगले शिक्षण मिळण्यासाठी गुरुजी-साम-दंड -भेद या निरनिराळ्या मार्गाच्या अवलंब करतात व छात्राला विद्या विभुषित करतात तसे परमार्थात पण परमेश्वर प्राप्तीचे मार्ग सांगितले आहेत.
परमेश्वराला त्याची भक्ती आवडते तेव्हा परमेश्वर प्राप्ती साठी भक्तीभाव, नम्रता या मार्गाचा अवलंब करणे श्रेयसस्कर ठरते.
साधारण माणूस या मार्गाचा अवलंब न करता तप-तपश्चर्या, योग अशा अवघड मार्गाने परमेश्वर प्राप्तीचा प्रयत्न करतो.
या कलीयुगात ईश्वर प्राप्तीसाठी अत्यंत सोपा मार्ग सांगितला आहे आणि तो मार्ग म्हणजे अखंड नामस्मरण. हे करण्यास अत्यंत सोपे आहे. त्यासाठी कोणतीही अडचण नाही. तुम्ही श्रीमंत आहात का गरीब याची चिंता करु नये.
ज्या ठिकाणी असू त्या ठिकाणी ते तुम्हाला करता येते. कुठे वनांत-गुहेत जाण्याची गरज नसते. असे हे सोपे-सरळ ईश्वर प्राप्तीचे खरे साधन असताना आपण मात्र रस्ता चुकून इकडे तिकडे भटकत असतो.
तेव्हा साधकाने सावध होवून नामस्मरण हाच ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग आहे हे लक्षात घेवून सतत नामस्मरणात रहावे.
मुखामध्ये सतत नामस्मरण असण्यामुळे काम, क्रोध, मोह हे विकार आपणापासून दूर जातील. ईश्वर प्राप्तीच्या मार्गातील विषय आसक्ती दूर होईल व ईश्वर प्राप्तीचा सोपा मार्ग दिसू लागेल.
परमार्थात प्रत्येकाला हा सोपा मार्ग दिसावा यासाठी प्रपंचात नामस्मरणाचा ध्यास घ्यावा व हा सोपा मार्ग साधुन ईश्वर प्राप्ती करुन घ्यावी. प्रपंचात आनंद समाधान मिळवावे.
अरिहंत – अरिहंत नाम मुखी असावे!