भेट हा शब्द दोन अर्थी वापरला जातो.
भेट म्हणजे भेटवस्तु व भेट म्हणजे नाते संबंध जोडणे.
हा भेट शब्द प्रपंचात व परमार्थात वापरला जातो. जसे भेट म्हणजे भरत भेट, रामलक्ष्मण भेट, दिवाळी भेट, संक्रांत भेट, वाढदिवस भेट, वर्षा भेट, संत भेट, समर्थ भेट, जीवन गौरव भैट, सद्गुरु भेट, अशा अनेक भेटी आपण जीवनामध्ये पहातो, अनुभवतो.
या भेटी विधात्याने घडवून आपल्या असतात. तेव्हा कोणतीही भेट ही अकारण भेटत नाही.
या भेटीची वेळ विधात्याने त्याच्या डायरीत नोंद करुन ठेवली असते व या भेटीतून कांही सकारात्मक बोध व्हावा अशी त्याची इच्छा असते.
तेव्हा हे दोघांचे भेटीचे नाटक विधात्याने घडवून आणले असते.
भेट ही मित्र -मित्रांची असो, प्रत्येक भेटी मध्ये कांंही गुढ लपलेले असते. ते गुढ शोधणे हे विवेकी साधकाचे काम असते. ती त्या साधकाची कसोटी असते.
रामलक्ष्मण सीता यांची भेट रामायणात झाली त्या भेटीतून संपूर्ण रामायण जगा समोर आले. वडीलांनी दिलेल्या शब्दाचे पालनार्थ सीता व लक्ष्मण यांचे सह चौदा वर्षाचा वनवास स्विकारुन रामाने अनोखी भेय दशरथाला दिली.
इकडे आयोध्येत रामाच्या वनवास गमनानंतर रिक्त झालेल्या आसनावर आरुढ न होता, वडील भावाचा मान मनांत ठेवून चौदा वर्षे त्यांच्या पादूका सिंहासनावर ठेवून त्यांची पूजा भरताने केली व वनवासातून परत आल्यावर ते सिंहासन व त्या पादूका भरताने रामाला भेट म्हणून अर्पण केल्या ही पण मोठी भेट रामायणाने जगाला दिली.
प्रपंचात पण आपल्या भेटीतून दुसर्याला आनंद मिळतो का याचा विचार करावयाचा असतो. स्वत: त्रास सोसून इतरांना संकटातून मुक्त करणे ही मोठी भेट आहे. ती भेट देण्यचाा प्रापंचिकाने प्रयत्न करावयाचा असतो.
भेटीने मनांत व घरांत आपलेपणा वाढतो. मी आहे ना, ही शब्दाची भेट लाखो रुपयांचे भेटीपेक्षा श्रेेष्ठ होय.
या भेटीतून नाते संबंध समृद्ध होतात. हे संबंध लाख मोलाचे असतात.
प्रपंचाच्या बाजारात प्रत्येक गोष्टीची किंमत केली जाते. तेथे सौंदर्य स्वस्त आहे, पण ते टिकविणारे चारित्र्य महाग आहे. म्हणून सौंदर्याला चारित्र्याची भेट द्यावी लागते.
बाजारात घड्याळे कवडी मोल किंमतीत मिळतात, पण घड्याळाने दाखविलेली वेळ कितीही पैसा ओतला तरी परत मिळत नाही. म्हणून वेळेचे नियोजन करा, वेळेला घड्याळाची भेट द्या.
प्रपंचात शरीराला कवडीचा भाव असतो. तर सत्कृत्याला मोलाचा भाव असतो. तेव्हा सत्कृत्ये करा. ती करीत असताना शारीरिक कष्टाची भेट द्या तर भैत्री संबंध अखंड टिकून रहातील.
मानवतावादी जीवनाचा हाच खरा भाव आहे. त्याची भेट मानवा-मानवामध्ये वाटा.
अक्षरांच्या ओळखी सारखी माणसांची नाती असतात. गिरवली की ती अधिक लक्षांत रहातात आणि वाचली तर अधिक समजतात.
तेव्हा ही मैत्रिची, नात्याची, प्रेमाची भेट आपल्या जीवलगांत वाटू या व आनंदमय जीवन जगण्याचा प्रयत्न करु या.