भवदर्पण

दर्पण याचा अर्थ आरसा. ज्यामध्ये आपण आपला चेहरा बघतो, गेलेला काळ पहातो.

आरशात पाहुन आपला चेहरा, मोहरा, कवडा निटनेटका आहे का नाही याचा अंदाज घेतो व त्याप्रमाणे सुधारणा करतो.

तेव्हा प्रपंचात या आरशाची (दर्पणाची) अत्यंत गरज असते. या दर्पणासमोर उभे राहून आपण जसे आपले सौंदर्य वाढवतो, तसे काळरुपी दर्पणात पाहून आपण मनाने निर्मळ आहोत का? हे पहावयाचे असते.

भव म्हणजे जन्म. असे भव भवांतर म्हणजे चौर्‍याऐंशी लाखाच्या फेर्‍यात फिरुन हा मानव भव आपणाला प्राप्त झाला आहे.

इतर योनीत आरसा, दर्पण, पावडर या गोष्टी नसतात. याबद्दल विचार करण्यास जागाच नसते. फक्त मनुष्य भवामध्ये आपण आरशात पाहू शकतो व या जन्मात नक्की काय करावयाचे हे ठरवू शकतो.

ज्यावेळी हे भवदर्शन मनुष्य घेईल त्यावेळी त्याला वाटते, खरोखर आपल्या अंत:करणामध्ये देव असावा. जोपर्यंत त्या देवाची भक्ती मनापासून होत नाही. तोपर्यंत समाधान शांती लाभत नाही. या साठी मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसाने आपल्या आत्म्याचे दर्शन वारंवार घ्यावे.

भवदर्पण काय दर्शविते? – शुद्ध भाव व त्यांचे फळ

भाव शुद्ध असेल तर आत्मा अरिहंत पदाकडे जातो,तो सिद्ध पदावर जातो, तो आचार्य बनु शकतो. साधुुसंत होवून समाजाचे परिवर्तन घडवू शकतो.

तो प्रपंचात अडकला तर त्याला मनुष्यगती पुनर्जन्म भोगावा लागतो. काहींना प्राणी, पक्षाचा जन्म घ्यावा लागतो. काहीजण मात्र कर्मात अडकून माया, मोह, मत्सर यांचे अधिन होवून नरक गतीत जातात. त्यांच्या दु:खाला पारावार रहात नाही.

अशा या गोंधळलेल्या अवस्थेत आपण प्रपंचात उभे आहोत. तेथे नरकगतीतील यातना भोगुन आपण उभे आहोत तेथे आपण गोंधळून गेलो आहोत.

तेथे एक निशाण दाखविले आहे ते वरच्या दिशेने खुणवीत आहे. एवढ्या यातना सोसल्यावर त्याला देवगतीचा मार्ग दिसू लागतो तेथे तो समाधानी होतो.

मार्गात त्याला चांगली संगत भेटते व त्याची वाटचाल देवगतीकडे सुरु होते. या प्रवासात त्याला प्रपंचात चिकटलेल्या सर्व व्याधी उपाधी प्रापंचिक चिंता, कटकटी त्याची साथ सोडतात व तो एकटाच मार्गस्थ होतो.

असेच एकला मार्गस्थ झाल्यावर तो एका उच्च ठिकाणी पोहोचतो त्या ठिकाणी त्याला एक मुर्ती दिसते ती असते वीतराग प्रभूची, अरिहंत भगवान यांची, तिर्थंकर भगवान महावीर यांची तेथे त्याला जाणीव होते.

याचसाठी केला होता सर्व प्रपंच, ते भाग्य मला लाभले, मी कृतकृत्य झालो , ही भावना निर्माण होण्यासाठी या जन्मामध्ये मला वारंवार आरशाची मदत घ्यावी लागली.

मी ती घेतली त्या दर्पणाने मला माझ्यातील काया दोष आहेत त्याचे स्मरण करुन दिले व काय करणे गरजेचे आहे, याचा मार्ग दाखविला. त्याचा परीणाम म्हणून मी येथे पोहोचू शकलो.

तेव्हा आयुष्यात इष्ट ठिकाण गाठण्यासाठी आपण भवदर्पणाचा वापर केला पाहिजे.

भवदर्पणात आपणाला पुढील गोष्टींची उत्तरे मिळतील.
1) हा जीव शोक कां करतो?
2) निर्धन का होतो?
3) दुष्ट पति अगर पत्नि का मिळते?
4) अंध का होतो ?
5) लुळा पांगळा का होेतो?
6) लंगडा अपंग का होतो?
7) बहीरा का होतो?
8) कपटी का होतो?
9) रोगी का होतो ?
10) भोगापभोगाची सामग्री मिळूनही भोगोपभोग का करु शकत नाही?
11) अत्यंत क्रोधी का होतो?
12) आदर सत्कार का मिळत नाही?
13) आई मुलांमध्ये वैर का असते?
14) अधिक ओझे वाहणारा हमाल का होतो?
15) दिर्घायुषी असून ही दु:खी का होतो?

याचे उत्तर एकच – आपण भवदर्पणात पहात नाही. प्रत्येक कर्म करीत असताना भवदर्पणात पाहून कर्म करा.

विवेक जागृत ठेवा. केलेले कर्म भगवंताला अर्पण करा. निर्मोही बना व आनंदात जीवन जगा.

Leave a comment