जीवन धर्म

जीवन जगण्याची पद्धत याला जीवन धर्म म्हणतात.

प्रत्येक जण जन्माला येतो व यथावकाश मृत्युला सामोरे जातो. जन्म घेणे व मृत होणे या मधील जो काळ आहे, त्याला जीवन म्हणतात.

ते जीवन कसे जगायचे यासाठी कांही कल्पना आहेत. त्या आचार विचारांची एक प्रणाली आहे. तिला जीवन धर्म म्हणतात.

इतर प्राणी व मानव यांत येथेच फरक दिसतो. इतर प्राणी जन्म घेतात, विहित कर्म करतात व जीवन संपवितात.

मनुष्य प्राणी असा एक प्राणी आहे, त्याला काय करावयाचे व काय करायचे नाही याचे ज्ञान असते. त्याप्रमाणे विचाराने तो जीवन जगत असतो.

काही लोकांना मात्र आपण का जन्माला आलो? हेच माहित नसते व माहित करुन घेण्याची त्यांची इच्छा पण नसते.

ते फक्त जन्माला आले म्हणून येतात व जन्म संपला की निघून जातात.

पण इतक्या पुण्याईच्या साठ्यातून मिळालेल्या मनुष्य जन्माचा ते विचारच करीत नाहीत.

जगाच्या मोहात, आसक्तीत, काम, क्रोध, मोह, विषय आसक्ती यांचे सानिध्यात अधर्माचे आचरण करीत करीत आपला जन्म पूर्ण करतात. ज्यांना जीवनाची खरी कर्तव्ये कळत नाहीत.

ती कर्तव्ये प्रत्येकाला माहित असणे गरजेचे आहे. यासाठी एकवीस गुणांची गरज असते.
ते गुण याप्रमाणे —-

1. गंभीरता : जीवनाकडे गंभीरतेने पहा. नुसतीच जन्माची फेरा फेेरी करु नका.

2. गुण परीक्षा : तुमच्यातील चांगल्या गुणांची परीक्षा तुम्ही करा. यातून तुमच्यातील चांगल्या गुणांची तुम्हाला ओळख होईल.

3. परमेश्‍वराने विनोमोल दिलेल्या शरीराची ओळख करुन घ्या व त्याप्रमाणे वागा.

4. अक्रुरता : जीवन जगत असताना कुणावर अन्याय होत नाही हे पहात रहाणे ही जीवन जगण्याची चौथी पायरी होय.

5. चांगल्यांचा सहवास व परोपकार ही जीवन जगण्याची पांचवी पायरी आहे.

6. दूसर्‍यातील दोष पाहू नका : आपल्यातील दोष कमी करण्याचा प्रयत्न करा.

7. अनिष्ट गोष्टी करण्याचे भय वाटणे, ही जीवन धर्माची सातवी पायरी होय.

8. सरळ मार्गाने छल कपट न करता जीवन जगणे ही जीवन धर्माची आठवी पायरी आहे.

9. इतरांच्या भल्यासाठी कष्ट करणे. परोपकारी वृत्ती ठेवणे ही जीवन धर्माची नववी पायरी होय.

10. कोणत्याही गोष्टीचे रहस्य(गुपीत) राखणे याला झाकली मुठ सव्वालाखाची म्हणतात व ती जीवन धर्माची दहावी पायरी होय.

11. जीवन जगत असताना इतरांचा विचार मनांत येणे व त्या विचाराने जगणे ही जीवन धर्माची अकरावी पायरी आहे.

12. तटस्थपणे कोणत्याही गोष्टींकडे पहाणे, ही जीवन धर्माची बारावी पायरी होय.

13. एखाद्याने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक करणे, गुणग्राहकता आपणाजवळ असणे ही जीवन धर्माची तेरावी पायरी आहे.

14. चांगल्या गोष्टींचे श्रवण व मनन करणे व त्याप्रमाणे वागणे ही जीवन धर्माची चौदावी पायरी आहे.

15. जीवन धर्म उत्तम होण्यासाठी तुमचा परीवार एकजुट , पवित्र असण्याची गरज आहे. ही पवित्र प्रेमळ परीवार ही पंधरावी पायरी होय.

16. जीवन धर्म चांगला करणेसाठी दूर दृष्टी हवी. स्वार्थाला लगाम घालणे गरजेचे असते. ज्याने तो लगाम लावला तो जीवन धर्मात सोळाव्या पायरीवर गेला असे समजावे.

17. माणसातील चांगल्या गुणांचे परिक्षण, जड वस्तुतील दोषांचे निरिक्षण करा, म्हणजे दगडातून हिर्‍याची प्राप्ती होईल व जीवन धर्मातून संतांची परीक्षा होईल.

18. वृद्ध लोकांचा मान सन्मान करणे, त्यांचा आशीर्वाद घेणे यातून तुम्ही जीवन धर्माच्या आठराव्या पायरीवर जाल.

19. विनय : तुमच्या जवळ जर हा गुण असेल तर तुम्ही जीवन धर्माचे एकोणीसाव्या पायरीवर विराजमान व्हाल.

20. एखाद्याने आपल्याला केलेली मदत न विसरता ती परतफेड करण्याची भावना ठेवणे. ही वृत्ती तुम्हाला जीवन धर्माचे मंदीराची विसाव्या पायरीचे दर्शन देईल.

21. या सर्व गोष्टी करीत असताना इतरांचे हीत ही भावना जेव्हा तुमचे मनांत येते. त्यावेळी तुम्ही जीवन धर्माचे मंदीराचे शिखर गाठले असे होईल.

ते शिखर गाठण्याचा प्रयत्न आपण करुया ही भावना.

Leave a comment