चांगल्या गोष्टीची सुरवात करताना शुभ – लाभ बघीतले जाते.
लाभ याचा अर्थ नफा, तो निर्भेळ असावा म्हणून शुभ वेळेत काम सुरु करावे व त्या कामाला सर्व बाजुने परमेश्वराने आशिर्वाद द्यावेत. हा शुभ- लाभचा अर्थ आहे.
लाभ याचा अर्थ प्रयत्नपुर्वक केलेल्या कष्टाचे आनंददायी फळ होय. लाभ हा परमेश्वराचा प्रसाद असतो. तो टिकावू असतो. तो लाभ सर्वांना आनंद देणारा असतो. या उत्कट भावनेने पूजा करीत असताना भिंतीवर वहीवर शुभ लाभ लिहीले जाते.
शुभ वेळ व सात्विक लाभ घडावा म्हणून चांगली वेळ पाहून कामाला लागा असा संदेश पुर्वज आपणाला देत आहेत.
लाभ हा सर्वांनाच हवा असतो. चोर, दरोडेखोर यांना पण लाभ हवा असतो. त्यामध्ये शुभ भाव नसतो. तो शुभ भाव आपल्या लाभात यावा यासाठी शुभ हे लाभाला जोडले आहे.
लाभाचे अनेक प्रकार आहेत. बँकेत लाभांश दिला जातो. आपण ठेवलेल्या रकमेवर झालेल्या नफ्यातून सर्व खर्च वजा करुन जो फंड तयार होतो, त्या फंडातून भागधारकाला लाभांश दिला जातो हा पण दिला-घेतल्याचा व्यवहार असतो.
शैक्षणिक क्षेत्रांत निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते, त्यात सहभागी झालेल्या स्पर्धकांना त्यांनी दाखविलेल्या नैपुण्याप्रमाणे लाभ दिला जातो त्या स्पर्धकासाठी तो लाभांशच असतो.
प्रपंचात पण आपल्या घरामध्ये एखादे बालक जन्माला आले तर तो पण एक प्रकारचा लाभच असतो.
समाजात गोर-गरीबांसाठी कार्य करणार्या थोर व्यक्तींचा गौरव केला जातो. त्यांना राष्ट्रपती पदक दिले जाते, हा पण एक प्रकारचा लाभच असतो.
लाभ हा निर्मोही मनाने केलेल्या कर्माचे फळा समजावे.
एखाद्या चांगल्या साधुसंतांची आपली गाठ पडणे, त्यांचे प्रवचन ऐकणे, त्यांचे सानिध्य लाभणे हा पण एक अनोखा लाभच होय.
परमार्थात पण परमेश्वराची अखंड भक्ती निरपेक्ष पणे करीत राहिले, तर न मागता तुम्हाला ईष्ट फळप्राप्ती होईल.
तेव्हा ही शुभ-लाभ जोडी प्रत्येकाने ध्यानात घेवून कार्यसिद्धी करुन घ्यावची आहे.
चांगल्या बिजा पोटी चांगलीच फळे चाखायला मिळतात मग आपण योग्य वेळी मेहनत करुन चांगले संस्काराचे बी प्रपंचात पेरले तर त्या पासून होणारा लाभ शुभ दायक होईल.
प्रपंच आनंदी समाधानी होईल.