डॉ. प्रकाश भंडारी, म्हणजेच बापुजी एक असे व्यक्तिमत्व ज्यांनी वैद्यकशास्त्र आणि आध्यात्म यांचा समतोल राखून आपले जीवन रुग्ण सेवेत आणि समजकार्यात वाहून घेतले.

श्रीमती कुमुद मेहता
‘चिंतन प्रकाश’
Brief info
‘चिंतन प्रकाश’ हे पुस्तक विद्यार्थी, गृहिणी, सेवानिवृत्त इ. सर्वच थरातील लोकांसाठी अतिशय उपयुक्त आहे.
जीवन आनंदात कसे घालवावे, ध्येय कसे ठरवावे, आपले संभाषण सगळ्यांबरोबर कसे चांगले होईल, परीक्षेच्या दिवसांमध्ये काळजी कशी घ्यावी, स्मरणशक्ती, एकाग्रता कशी वाढवावी अशा अनेक महत्वाच्या मुद्यावर या पुस्तकात चर्चा केली आहे.
यात सांगितलेल्या सर्व गोष्टी सहज करता येण्याजोग्या असून खुपच सोप्या आहेत. स्वत:ला सकारात्मक सूचना देणे किंवा लिहीणे, जगात आपण काही गोष्टी अशा करतो की 80% मेहनत घेतल्यावर 20% फळ मिळते. तर काही गोष्टी अशा असतात की 20% मेहनत घेतल्याने 80% फळ मिळते.
या पुस्तकात अशा गोष्टी सांगितल्या आहेत की, 20% मेहनत घेऊन 80% फळ मिळू शकते. उदा. एकाग्रता चांगली होण्यासाठी थोडीफार मेहनत घेतल्याने प्रचंड प्रमाणात फायदा मिळू शकतो. एकाग्रता चांगली झाल्यास कोणतेही ध्येय आपण लवकर गाठू शकतो.
याशिवाय यात वर्षभरातील सर्व सणांचा यथोचित उहापोह केला आहे. त्याचबरोबर नातेवाईक, त्यांचे वाढदिवस, केलेले कार्य यांचा गौरव केला आहे. आणि जे आपल्यातून दूरवर निघून गेले आहेत, कधी परत न येण्यासाठी अशांच्या स्मृती जागवल्या आहेत. जेणेकरुन त्यांना आदरांजली दिली आहे.
त्यांच्या अनेक आठवणी देऊन त्यांच्या बरोबरचे आपले रम्य जीवन उभे केले आहे. सदाबहार आठवणींचा कल्पवृक्ष उभा केला आहे. त्यांचा मऊ मुलायम स्पर्श मनाला टवटवी देऊन जातो.
हे सर्व करताना प्रचंड चिंतन जाणवते. विपुल अभ्यास जाणवतो.
म्हणून म्हणावेसे वाटते की,
कलम तो सबके पास हैं पर लिखता तो कलमकारी ही है.
कधीतरी अव्यक्त व्यक्त करावे. निशब्द राहून नवे शब्द द्यावेत. स्वत:ला नव्याने पहावे. जगताना थोडे असे व्हावे की शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे.
कारण धार असलेले शब्द मन कापतात तर आधार असलेले शब्द मन जिंकतात.
मन आणि छत्री याचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा ते उघडते.
नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते. मन इतके मोठे असुद्या की कोणी तुमच्या शेजारी बसू शकेल. आणि मान असा मिळवा की तुम्ही उभे राहिल्यावर कोणी बसू शकणार नाही.
किती सहज संदेश दिला आहे. डॉ. प्रकाश भंडारी यांची बहीण म्हणून हे माझे मत नाही तर एक तिर्हाईत म्हणून केलेले प्रामाणिक मत आहे.