सुख – सुख म्हणजे काय असतं ?
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं,
भर पहाटे धुक्याची रेषा डोळ्यांना दिसणं,
सोनचाफ्याची फुले वेचताना हातांचे सुगंधी होणं,
नंदा दिपातल्या ज्योतीकडे एक क्षण बघणं,
सुख -सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं,
साधीशी कढी, सुद्धा मनाजोगी जमणं,
हातावर थापलेली भाकरी टम्म फुगणं ,
डब्यातला गुळाचा खडा हळूच जीभेवर ठेवणं,
सुख – सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं.
एखाद्या आजीचा हात धरुन रस्ता पार करणं,
वाटेत पडलेली केळीची साल आपणच उचलणं,
टपरीवरच्या चहाचा बिनदिक्कत आस्वाद घेणं,
सुख -सुख म्हणजे नेमकं काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं.
ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं,
एखाद्या चिमणीला जवळून बघणं,
हवेत उडणार्या म्हातारीचा पाठलाग करणं,
एक डाव लगोरीचा खेळायला मिळणं,
सुख – सुख म्हणजे काय असतं? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं.
खिडकीतून अचानक चंद्रकोर दिसणं,
रातराणीचा सुगंध उरात साठविणं,
पलंगावर पाठ टेकली की क्षणात डोळा लागणं,
सुख -सुख म्हणजे नक्की काय असते? ज्याच्यात मानावं त्याच्यात ते असतं.
सुख हे मानण्यात आहे. मनाला प्रसन्न ठेवा, उद्याच्या स्वप्नात आज सुख सामावले आहे, हे लक्षात ठेवा.
उद्याच्या स्वप्नाकडे आजची पाऊले वळवा,सुखाचा शोध तेथे लाभेल.
उद्याचा उद्याचा ठाव घेत मी एक एक दिवस काढला, ३६५ दिवसांच्या सुखाचा ठेवा मला सापडला.
कृतज्ञ आहे मी देवा, दे तुझ्या चरणी अखंड (विश्रांती) सेवा…