स्त्रीच्या चेेहर्याचे सौंदर्य हे चेहर्यावर फडफडणार्या बटात असतं असं म्हणतात.
खरचं आहे हे .
उन्हाळ्याचे दिवस होते. घरी पाहुणे येणार होते. तेव्हा त्यांचेसाठी श्रीखंड घ्यावा म्हणून मी चितळेचे दुकान गाठले. तेथे भली मोठी रांग होती. त्या दुकानांत ‘दूध, दही, ताक, लोणी, तूप’ हे सर्व बघून वाटलं की हे सर्व त्या स्त्री जीवनाच्या अवस्था आहेत.
मी विचार करु लागलो. एक एक बट स्त्री जीवनाचे सौदर्य खुलवत होती.
पहिली सुंदर बट म्हणजे शुभ्र ‘दूध’. लग्नापूर्वीचे जीवन हे कुमारिका जीवन, म्हणजेच माहेर, आईवडील यांचेशी नाते, ते पण कसे तर शुभ्र, सकस निर्भेळ ,त्यात स्वार्थ नाही. तेथे स्वार्थ चालतच नाही. प्रयत्न केला तर लक्षात येते की ते दूध बेचव होते. तिला या अवस्थेत आपल्या प्रमाणे हे जग सुद्धा स्वच्छ, सुंदर निरागस दिसतं. येथे तिची निरागस छटा दिसून येते.
‘दही’ लग्नामुळे माहेरपणाचे वीरजण लागतं व ती स्त्री कुमारिकेची वधू होेते. तिथे तिचे दुधाचे नांव बदलून ती दही होते. तेथे त्याच अवस्थेत ती कायम थिजुन रहाते. ही तिची थिजून रहाण्याची अवस्था म्हणजे दही होय. लग्नाचे दिवशी मुलाची झालेली बायको पुढे अनेक वर्षे त्याच भुमिकेत थिजून रहाते. आयुष्यभर ती आपल्या नवर्याला घट्ट धरुन असते. ही तिची दह्याची अवस्था होय.
“ताक” सर्वसामान्य स्त्रीया या प्रपंचाच्या रविने लग्नानंतर घुसळल्या जातात. या प्रक्रियेत ती स्त्री आता सून होते. म्हणजे दह्याचे ताक होते. दुधाला सकस म्हटले जाते. तसे ताक पण बहुगूणी. फार बडबड करणारे, अनेक ठिकाणी मिरवणारे असते. कधी बडबड करणारी सासू होते. वातप्रकृतीमुळे बडबडीवर इलाज म्हणून ताकाचा वापर केला जातो. तर रागावलेल्या नवऱ्याला (वात प्रकृतिचा) पित्त प्रकृतीचा या दोघांना शांत करणारे ठरते. असे आयुर्वेद सांगतो. सासरी मात्र दुधाचा फा रसा उपयोग होत नाही. तेथे मात्रा चालते ती फ क्त बहुगुणी ताकाचीच.
दुधात पाणी घातले तर ते बेचव होते, पण ताक पाणी घालून वाढतच रहाते व अनेक प्रपंचातील समस्यावर कामी येते.
‘लोणी’ अनेक वर्षाचा संसार करीत करीत आपण वीस वर्षानंतर त्या संसाराचे फ लीत काय असे विचारतो. तेव्हा प्रौढ झालेला 20 वर्षाचा म्हणजेच मऊ, रेशमी, मुलायम, नितळ, लोण्याचा गोळा नकळत समोर येतो. हे लोणी म्हणजे प्रपंच करीत असताना नवर्याबरोबर ठेवलेले अतुट नाते. कष्टाच्या रविनेे नाती टिकवीत कणा कणाने लोणी होवून प्रपंचातून अलगत बाजूला झालेले लोण्याचे रुप होय.
म्हातारपणी पण आपण तारुण्यात वागलो तसे वागण्याचा प्रयत्न करता करता चुलीवर लोणी तोंड काळं पडेपर्यंत कढत रहाते. ताकाला, लोण्याला परत दूध व्हायचं असतं. लोणी ही दूधाची अंतिम अवस्था नसते. तेथे ती फार काळ तग धरुन राहू शकत नाही. तेथे ते आलं रुप बदलतं. नवर्याच्या नात्याचं प्रेम कढवून ती आता नातवासाठी आजीचं नव रुप घेते.
त्याच लोण्याचं आता कढवलेलं साजूक तुप होत. वरणभात असो, शित असो किंवा बेसन लाडू असो घरातील प्रत्येक गोष्टीत आता आजी नावाचं पळीभर साजूक तूप पडतं.
हे तूप देवासमोरच्या चांदीच्या छोट्याशा निरंजनात तुपाच्या गोळ्यात खोचलेली वात बनते. तेथे येणार्या जाणार्यांना हात जोडून आशिर्वाद देणारी चंदेरी केसांची आजी दिसते. घरासाठी, कुटूंबासाठी प्रार्थना करीत करीत हे तूप संपून जाते. हीच ती स्त्रीची अंतिम उच्च अवस्था होय.
तेव्हा ‘दूध ते तूप’ हा असा स्त्रीच्या जीवनाचा प्रवास होय.
“स्त्री” आहे तर ‘श्री’ आहे. हे या एवढ्या प्रवासानंतर लक्षात येते…
1 Comment
Swarani
अतिशय सुरेख पद्धतीने जीवन प्रवास मांडलाय सर्वोत्तम उपमा आणि अवस्था..