आपण समाजात नेहमी पहातो की ज्याचे जवळ भरपूर पैसा येतो तो श्रीमंत म्हणविला जातो.
पुढे पुढे लक्षात आले की पैसा आला की तो पैसेवाला होतो पण तो श्रीमंत होतोच असे नाही.
‘श्री’ या संज्ञेत पैसा, यश, सौंदर्य, श्रेष्ठत्व, अधिकार प्रतिष्ठा, उद्योगशिलता, सुस्वभावीपणा वगैरे अनेक गोष्टी येतात, तेव्हा श्रीमंताकडे पैश्या बरोबर वरील इतर गोष्टी पण येतात.
तेथे जाणवतं श्रीमंत व पैसेवाला यातील भिन्नता.
प्रत्येक श्रीमंत हा पैसेवाला असतोच पण प्रत्येक पैसेवाला श्रीमंत असतोच असे नाही.
अनेक पैसेवाले असे आहेत की त्यांना पैशाची फिकीर नाही. अलोट आणि मुबलक पैसा आल्यावर त्या पैशाला शिस्तीचे वळण न लावण्यामुळे तो पैसा घरात गडगंज असला तरी नियोजना अभावी व्यसनाधीनता, उधळपट्टी, अहंकार बेशिस्त या गोष्टी दिसून येतात.
अशा पैसेवाल्याचा सर्वत्र झगमगाट असतो. त्यात दिखावा व पैशाचा माज असतो.
भारी भारी किमती वस्तु घेवून हे पैसेवाले पैशाचा देखावा करतात. या पैसेवाल्यांकडे सुसंस्कृतपणा खूप कमी असतो.
या पैसेवाल्यांची दृष्टी मूल काय शिकते यापेक्षा कोणत्या इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षण घेते याकडे असते.
या पैसेवाल्या जवळ वाचन संस्कृती अभ्यासुपणा, विचारशिलता यांचा अभाव दिसतो.
याविरुद्ध कांही श्रीमंत मंडळी खूपच निराळी दिसतात. कित्येकांना स्वच्छतेची प्रचंड आवड असते, कुणाला पुस्तक संग्रह करुन छान लायब्ररी करण्याचा छंद असतो, तर कुणाला पुरातन शिल्प जमाविण्याचा.
शेतकरी जमीनीवर पाय ठेवून शेतात कष्ट करतात व स्वत:चे तसेच इतरांचे पोट भरतात. त्यांचे जवळ अभिमान नसतो.
असे हे शेतकरी खरे श्रीमंत होत. त्यांनी आपल्या संपत्तीचे भविष्यासाठी उत्तम नियोजन केले असते. त्याच्या नोंदी व्यवस्थित फाईल केलेल्या असतात.
त्यांचे पाशी त्याचा अहंकार देखावा नसतो. असे हे श्रीमंत कोट्टयाधिशांच्या पार्टीत पण जातात व गरीबाच्या सत्यनारायणाचे प्रसादाला पण जातात.
थोडक्यात श्रीमंत म्हणजे मोजकं उत्तम बोलणारे व्यक्तिमत्व होय. त्यांचे खाणे पिणे व्यायाम, सौंदर्य निगा या सर्वाकडे लक्ष असते त्यांचे बोलणे अदबशीर असते.
पैसेवाला होण्यासाठी भरपूर मेहनत घ्यावी लागते. कष्ट उपसावे लागतात. काहींना लबाड्या पण कराव्या लागतात. वेळेला जमीनी विकाव्या लागतात. असे पैसेवाला होणं कुणालाही शक्य आहे, पण श्रीमंत होणे एक प्रयत्न पूर्वक अव्हान आहे. हे ध्यानात घेतले पाहिजे.
पैसे वाल्यातून श्रीमंत होणे ही एक कला आहे ती कला विवेकी माणसाला साध्य होते.
त्या विवेकी माणसाने पैसेवाला होवून जगाचे कौतुकास पात्र व्हायचे, का श्रीमंत होवून गरजुंना मदत करावयाची हे ठरवले पाहिजे.
तेव्हा ‘श्री’ ची, ईश्वराची प्रतिष्ठा राखणे साठी आपण श्रीमंत होवू या सर्वांना सोबत घेवून, श्री ची उपासना करुया श्रीमंत होवू या.
2 Comments
सो. शिला केतकर
श्रीमंती आणि पैसेवाला यातील फरक डॉक्टर साहेबांनी फारच छान रीतीने सांगितला आहे प्रत्येक पैसे वाला श्रीमंत असतोच असे नाही हे अगदी बरोबर आहे
श्री म्हणजे संपत्ती याबद्दल माझ्या वाचनात काल आणखीन एक गोष्ट आली श्री म्हणजे जिवंतपणा आपण जिवंत व्यक्तीच्या आधी श्री लावतो आणि गेलेल्या व्यक्तीबद्दल कै असे अक्षर लावतो
श्री म्हणजे जिवंतपणाचे प्रतीक आणि हे प्रतीक सांभाळण्यासाठी
माणसाने विवेकी , परोपकारी, असे असले पाहिजे ही गोष्ट अगदी सत्य आहे
राम कृष्ण हरी🙏
Anonymous
खुप खुप मार्गदर्शन करणारा लेख!!!