प्रहार व प्रघात हे जरी मिळते जुळते शब्द असले तरी त्या दोन्ही शब्दात मोठा विरुद्ध अर्थ साठविलेला आहे.
ज्या सोन्याच्या तारेवर प्रहार करीत त्याचे चांगले चांगले अलंकार बनविले जातात. तेथे सोन्याच्या तारेवर झालेले प्रहार आपण पाहू शकत नाही. मात्र त्यातून निर्माण झालेले अलंकार जगभरात मिरवू शकतो. हा झाला प्रहार
आता असे दागिने कपात ठेवले व चोरांनी चोरी करुन पळविले व त्या माणसाची दैन्यावस्था करुन टाकली . हा झाला प्रघात. येथे नशिब प्रारब्ध समोर येते.
बालपणात चांगले शिक्षण मिळावे. चांगले संस्कार घडावेत म्हणून शिक्षक छडीद्वारे मुलांचे हातावर शिक्षेचा प्रहार करतात व त्याला परिक्षेत उत्तम गुण मिळवून देतात, पण कांही मुले अनेक वेळा शिक्षा देवून (प्रहार करुन) देखील नापासच होतात. अशा वेळी कंटाळून ती मुले नैराश्याने शाळा सोडतात. काही वेळा जीवन संपवितात. हा त्यांच्या पालकावर झालेला प्रघात होय.
प्रहार हा कोणीतरी करणारा असतो व प्रघात हा प्रारब्धाने समोर येणारे संकट असते. सारांश – चांगले बनायचे असेल व आदर्श निर्माण करावयाचा असेल तर प्रहार हे सोसावेच लागतात.
टाकीचे घाव सोसच्या शिवाय देवपण येत नाही. हे अगदी बरोबर प्रहाराचे उदाहरण होय.
जेष्ठांच्या हातामध्ये हातोडा(छडी) दिली आहे. त्यांना नातवंडाना चांगले घडवायचे आहे. अशा वेळी अनुभवाची शिदोरी बरोबर ठेवून अलगत टाकीचे घाव जर नातवंडावर घातले तर त्यातून उत्तम तरुण पिढी निर्माण होणार आहे.
न दुखवता जरुर तेथे संस्काराचे घाव/ प्रहार घालीत गेलो की उत्तम व्यक्तिमत्वे समोर येतील. या पुण्यसंचयातून आदर्श राष्ट्राची उभारणी प्रघात म्हणून होईल.
तेव्हा विवेक जागृत ठेवून प्रघात करत जावा,प्रहार आपोआप दृष्टीआड जाईल.