कोणत्याही ठिकाणी जायचे असेल तर त्यासाठी निरनिराळे रस्ते असतातच. काही खडतर असतात तर काही सुलभ असतात, तर काही द्रुतगती जाणारे चकचकाट रस्ते असतात.
तसेच मोक्षाप्रत जाण्यासाठी पण तीन रस्ते सांगितले आहेत.
पहिला मार्ग जो अतिशय खडतर असतो पण तो खेड्यापाड्यातून जातो. अडचणीच्या गावांची सोय करतो. पण त्या मार्गावर बरेच थांबे असतात, त्यामुळे त्या मार्गाने मोक्षास पोहोचणेस वेळ लागतो.
दुसरा मार्ग जरा सोईचा असतो. त्यामार्गावर बर्यापैकी रस्ते असतात. वहानांची संख्या पण खूप असते, पण गर्दीमुळे त्या मार्गावरुन जाताना कोंडी होते व त्या मार्गाने जाताना पण वेळ लागतो.
तेव्हा तिसर्या मार्गाचा शोध घेतला तो राजमार्ग निघाला. त्या मार्गावर चकचकीत डांबरी , सिमेंटचे रस्ते, कोठे वर्दळ नाही, अडचण नाही, गर्दी गोंगाट नाही, प्रवासात कुठे थांबावे लागत नाही. या मार्गाला द्रुतगती मार्ग म्हणतात.
या मार्गावर साधकाला चांगली गती घेता येते व त्या मार्गाने तो मोक्षप्रत लवकर पोहोचू शकतो. हे मार्ग पाहिल्यानंतर पुढचा प्रश्न डोळ्यासमोर येतो ता असा – आपण कोणता मार्ग स्विकारायचा?
ज्या मार्गावर प्रपंचात काम, क्रोध, मोह, माया यांची गर्दी आहे तो मार्ग स्विकारला तर प्रापंचिका प्रमाणे आपण त्या प्रपंचातच अडकून राहू व मोक्षमार्गाकडे लवकर पोहोचू शकणार नाही.
जर राज्य सरकारने बनविलेला मार्ग स्विकारायचे झाले तर तेथे सीमेवर अडथळे, परवाने आले, गर्दी आली, ज्याला लांबचा प्रवास करावयाचा आहे त्याने या सर्व गोष्टींचा विचार करुन द्रुतगती मार्गाचा अवलंब करावा.
प्रपंचात काय किंवा परमार्थात काय आपण स्वत:च विवेक जागृत करुन आपला मार्ग शोधायचा असतो. काही वेळा खडतर मार्ग स्विकारावा लागतो. काही ठिकाणी गर्दी गोंधळ यांना सामोरे जावे लागते.पण ज्याने द्रुतगती मार्ग स्विकारला त्याला मोक्ष सहज साध्य झाला.
द्रुतगती मार्ग शोधण्यासाठी प्रपंचातील आसक्ती, विषयाची आसक्ती कमी करत गेले पाहिजे.
या मध्ये गरजेप्रमाणे पहिले दोन्ही मार्ग अवलंब करीत करीत साधक हा द्रुतगती मार्गावर येतो. तेथून त्याचा प्रवास मोक्षाकडे आनंदाने सुरु होतो. या मार्गातच साधकाच्या जीवनाची इतिश्री असते.
साधकाने प्रथम आपली विवेकबुद्धी जागृत करावयाची असते. मोक्ष हे ठिकाण नक्की करावयाचे असते. प्रपंचापासून खडतर मार्ग आक्रमत त्याने गर्दी गडबडीचे मार्ग पार करत करत राजमार्ग गाठला पाहिजे. जरुर त्या ठिकाणी काही श्रम केले पाहिजेत.
असे प्रयत्न करीत करीत मोक्षाप्रत नेणारा राजमार्ग दिसेल, त्यावर एकट्यानेच भरधाव वेगाने मोक्ष प्राप्ती करावयाची असते.
अशा प्रकारे मोक्ष प्राप्तीचे तीन रस्ते शोधून आपण मोक्षाचे ठिकाण गाठावयाचे असते.