वयानुसार येणारी श्रीमंती व प्रपंच करीत करीत, काबाडकष्ट करीत करीत जमविलेली संपत्ती व त्यातून येणारी श्रीमंती, यातली खरी श्रीमंती कोणती? असा प्रश्न उभा रहातो.
काबाडकष्ट करुन जमवलेली संपत्ती आज आहे तर उद्या निघून जाईल. ती शाश्वत संपत्ती नाही.
पण वयानुसार माणसाकडे येत असणारी संपत्ती ती शाश्वत असते. तिच्याकडे आपण लक्ष ठेवून असतो.
माणसाचे जसे जसे वय वाढते तस तसे तो श्रीमंत बनत जातो. ती श्रीमंती त्याचे शरीरावर दिसू लागते.
विचाराने प्रपंच करीतकरीत त्याचे काळे केस पांढरे होतात. एक दिवस सर्व केस पांढरे होतात व सर्व डोक्यात चांदी भरुन जाते. ही असते अनुभवाची चांदी.
तिची साठवण पण लॉकर प्रमाणे डोक्यात केली जाते. वयोमानाने पचनास हलका सोन्यासारखा आहार घेत घेत एक दिवस चर्वण करणारा दात पण सुवर्णमय होवून जातो. तेथे दातांत सोने दिसू लागते व वय वाढत वाढत त्याची दातात श्रीमंती दिसू लागते.
आयुष्यातील न विसरता येणारे क्षण हे या डोळ्यामध्ये साठविले जातात व त्याचा जो मोती तयार होतो तो श्रीमंतीच्या रुपाने डोळ्यात वसतो ही डोळ्याची श्रीमंती वयोपरत्वे माणसाकडे येते.
म्हणून म्हणतात माणूस जसा वयाने वाढत जातो, तशी त्याची श्रीमंती शरीरावर दिसू लागते.
जी शाश्वत आहे. जिला चोरीची भिती नाही. ती खरी श्रीमंती होय.
आयुष्यभर रक्ताचं पाणी करुन इतरांशी जमवून घेत घेत इतरांशी गोड बोलत बोलत जी गोडी माणसाचे शरीरात, माणसाचे रक्तात प्रविष्ठ होते, ते ते वयोपरत्वे त्याला मधुमेहाचा आजार जडतो. ही साखरेची किमया त्याला आयुष्यभर सोडत नाही. वयोपरत्वे त्याला मधुमेहाची लक्षणे दिसू लागतात. हा आजारपण वयोपरत्वे माणसाचे शरीरातून येणारा श्रीमंती दाखविणारा ठरतो.
श्रीमंती दाखविण्याचे कांही मार्ग असतात जसे सोने, हिरे, माणीक, रत्न यांचे खडे . जस जसा माणूस वयोपरत्सवे मोठा होत जातो. तस तसे या पैकी कोणते तरी खडे त्याच्या किडनीत, लिव्हर मध्ये जावून बसताता व तेथे ते आपली श्रीमंती दाखवितात, त्यामुळेच वाढत्या वयाबरोबर येणारी श्रीमंती आपण लक्षांत घेतली पाहिजे.
वयोमानाने प्रपंचाचे दगदगीत आपण पळापळी करतो. नको तिथे पाय वाकडा पडतो. हाडे ठिसूळ झालेली असतात, ती भंग पावतात, ती दुभंगलेली हाडे स्टिलच्या बारने जोडली जातात. पण ती जोडण्यासाठी जी बिले डॉक्टर दर्शवितात त्यात त्या माणसाची श्रीमंती लयास जाते व तेथे त्याच्या समोर प्रश्न रहातो.
तो परमेश्वराने हे सर्व आपणास मोफत दिले ती वयानुसार काळजीने साठविलेली श्रीमंती आरोग्य संपन्न जीवन ही खरी श्रीमंती होय.
प्रापंचिकाने कष्ट करुन मिळविलेली संपत्ती व श्रीमंती या पेक्षा योग्याने योग साधना करीत शरीर व मन यांचे संतुलन साधत जमविलेली संपत्ती यात योग्याने संपादित केलेली श्रीमंती शाश्वत वाटते.
आयुष्याचे अखेर पर्यंत शरीर निरोगी रहाणे हीच खरी श्रीमंती होय.
व्याधी शमनासाठी वापरली जाणारी संपत्ती व त्यातून होणारा श्रीमंतीचा देखावा हे खरी श्रीमंती दाखवत नाही.
परमेश्वराने दिलेल्या या आरोग्यसंपन्न जीवनाला आपण खरी श्रीमंती समजू.