ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेमकी गंगा बहाते चलो ।
अशी ही इवलीशी ज्योत आपले रहस्य सांगत आहे. ती म्हणते –
आधी होते मी दिवटी, शेतकर्यांची आवडती.
माझा प्रवास कष्टकर्या शेतकर्यापासून सुरु झाला.
मी त्या शेतकर्याची आवडती लेक होती.
तेथून झाले इवली पणती, घरा घरातून मिणमिणती, माझा प्रवास घराघरातून सुरु झाला.
माझ्या शांत व वात्सल्यामुळे, मला लोकांनी देवघरातील समई बनविले,तेथे मला देवा समोर नेऊन ठेवले.
देवार्यातील वातवरण शुद्ध करीत, तेथील अनिष्ट गोष्टी जाळीत मी देवार्यातून बाहेर आले.
माझे हे कार्य बघून लोकांनी मला काचेचा महाल अर्पण केला. त्याला तुम्ही कंदील म्हणता.
पण त्या महालातील मीच ती ज्योत आहे, हे विसरू नका.
मी किती जरी मोठी झाले तरी त्या इवल्याशा शेतकर्याच्या दिवटीला विसरले नाही.
माझे अस्तित्व या दिवटीतच आहे.
काळाच्या ओघांत मला निरनिराळ्या ठिकाणी आरुढ केले. अनेकांनी मला डोक्यावर घेऊन माझी मिरवणूक काढली. माझ्या शिवाय वराती अडु लागल्या.
मी, त्या ठिकाणी पण शेतकर्याची आवडती दिवटीच म्हणून राहिले.
मला बिजलीचे रुप प्राप्त झाले. त्यामुळे घरांत, मंदिरात लखलखाट झाला आहे. मी प्रसिद्धीच्या झोतात शिखरावर गेले आहे.
मला तर कळत नाही, परमेश्वरा माझ्यात काय बदल घडणार आहेत.
मला मात्र जाणीव आहे, मी त्या शेतकर्याची आवडती दिवटी आहे.
मला लोकांनी कितीही जरी मोठे केले, तरी माझे कर्तव्य काय ? माझे कर्म काय ? याची मला पूर्ण कल्पना आहे.
एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकळांना
कसलेही मज रुप मिळो
देह जळो अन् जग उजळो ।
जसे जगाच्या कल्याणा साठी, संतांच्या विभूती सारखी, अशा प्रकारे एक शेतकर्यांची आवडती दिवटी येवढा प्रवास करु शकते, तर आपण मानवांनी आपल्या हृदयात त्या ज्योतीला प्रज्वलीत करुन मानव जातीचे कल्याण का करु नये ?
आपण जरुर प्रयत्न करावा.
ज्योत जागविण्याचा!