आज पर्यंत जे जे मोठे साधु संत होवून गेले सर्वांनी परमेश्वर चराचरा मध्ये भरलेला आहे असे सांगितले.
असे असून मात्र आपण आपल्या डोळ्यांनी त्याला पाहू शकत नाही. याला कारण परमेश्वर हा झाकलेला आहे.
साधारण नजरेने तो दिसणार नाही. ज्या ठिकाणी तो दिसतो तेथे आपले डोळे दिपून जातात. त्याचे तेज एवढे प्रचंड आहे की पहाणाराची दृष्टी तेथे मिटली जाते.
म्हणून त्याला माणसांनी झाकलेला परमेश्वर करुन टाकले आहे.
परमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी उभा असलेला माणूस हात जोडून उभा असतो. त्याचे डोळे मिटलेले असतात याचा अर्थ साध्या डोळ्यांनी परमेश्वर दिसत नाही तो पहाण्यासाठी दिव्यदृष्टीची गरज आहे.
म्हणून म्हणले आहे परमेश्वर झाकलेला आहे. दिव्य दृष्टी शिवाय तो दिसत नाही सामान्य माणूस परमेश्वर आपल्या आवाक्या बाहेर आहे असे समजून त्याला झाकून टाकतो. त्याचेकडे दुर्लक्ष करतो.
परमेश्वराची पूजा करताना पण ताटात पूजेसाठी घेतलेल्या मूर्तिवर फुले पाने वाटून आपण त्याला झाकून टाकतो. तेथे आपणच परमेश्वराला झाकलेला परमेश्वर करुन टाकतो.
परमेश्वराचे दर्शन हवे असेल तर फुलांची, पैशाची गरज नाही. पैसा फुलांनी झाकलेला परमेश्वर तुम्हाला दर्शन देत नाही. तर भक्ती भावाने उघड नेत्राने शोधणार्याला त्याचे दर्शन लवकर होते. माणूस मात्र आपल्या श्रीमंतीमुळे परमेश्वराला झाकण्याचा प्रयत्न करतो.
देशात बालाजी, शिर्डी, पंढरपूर अशी किती तरी तिर्थयात्रे आहेत. तेथे लोक नवस बोलून पैशाची उधळण करुन परमेश्वर दर्शनाचा प्रयत्न करतात. पण हा प्रयत्न निष्फळ होतो. कारण या झाकणार्या वैभवातून पैशातून, लालसेतून तो केव्हाच निघून गेला असतो.
तो गुप्त होतो कधी अचानक प्रकट होतो म्हणून त्याला झाकलेला परमेश्वर म्हटले आहे. साधक परमेश्वराचे दर्शन घ्यायला जातो पण परमेश्वर ऐवजी तेथील माहोल-भोजन यात्री निवास-गर्दी याच गोष्टी पहातो.
या सर्वां पलीकडे असणारा झाकलेला परमेश्वर त्याच्या नजरेस येतच नाही. त्याला पहाण्याची दृष्टी आपणा पाशी नाही म्हणून आपल्या कमजोर नजरेने आपण पाहू शकत नाही.
त्या परमेश्वरावर पैशाची, वैभवाची इतकी उधळण केली असते की त्यातून त्याचे वैभवाचे तेजाने आपले डोळे दिपून जातात व डोळे मिटून जातात.
आपणाला मात्र वाटत रहाते परमेश्वर झाकलेला आहे तो आपण पाहू शकणार नाही. यासाठी परमेश्वर पहाण्यासाठी आपली दृष्टी तीक्ष्ण करावी.
माया, मोह, लालसा यांनी त्याला झाकून टाकले आहे ती सर्व लक्तरे बाजुला केली पाहिजेत व त्याला जे आवडते त्या भक्तीने शुद्ध भावाने त्याचे दर्शन घेतले पाहिजे.
तेथे मात्र आपण झाकलेला परमेश्वर म्हणू नये. उघड डोळ्यांनी सर्वत्र भरलेला परमेश्वर पहावा. त्याचे ज्ञान करुन घ्यावे.