पाठ म्हणजे धडा, शिकवण.
प्रपंचात असे अनेक पाठ आपण पहातो. जसे परिपाठ, गृहपाठ, पाढेपाठ, नित्यपाठ, पोळपाट तसा हा हरिपाठ आपली पाठ सोडत नाही, नाळ सोडत नाही.
माणसाला सुसंस्कृत ज्ञानी होण्यासाठी या पाठाची गरज असते .
बालक भूक लागली की रडण्यास सुरवात करते. ते रडायला लागले की आई सर्व कामे सोडून त्याला समजावते. हा झाला नित्य परीपाठ.
पुढे मुल मोठे होते. शाळेत जावू लागते, शाळेतून घरी येताना शाळेची नाळ जोडून रहावी यासाठी गुरुजी त्याला गृहपाठ देतात.
तो गृहपाठ तो न चुकता करतो व त्यातून तो ज्ञानी होतो. शाळेत त्याला पाढे शिकविले जातात. एक ते 100 चे पाढे, पावकी, निमकी, अडीचकी, औटकी असे बरेच पाढे पाठ करुन घेतले जातात तेथे त्याचे व्यवहारीक ज्ञान वाढत जाते व प्रपंचात तो कुठे चुकत नाही.
यातून जीवनात घडणार्या घटनां मधून कोणाचा गुणाकार करायचा, कुणाला कितीने भागायचे हे ज्ञाने होते, त्यामुळे हा परीपाठ जीवनाला यशस्वी बनविण्यासाठी उपयोगी होतो.
हे सर्व पाठ नित्यनियमाने करावे लागतात तरच त्याची प्रचिती आपणास येते.
स्त्रीयांच्या बाबतीत पोळपाट हा त्यांचा नित्याचा पाठ असतो. जीवन जगण्यासाठी परिवाराला जपण्यासाठी स्त्रिला हा परिपाठ न चुकता रोज करावा लागतो.
इतका पाठ पाहिल्या नंतर हरिपाठ काय आहे, हे न समजणारा माठच समजावा.
प्रपंच करीत असताना प्रत्येकाला वरील पाठांचा आधार घ्यावा लागतो. पुढे प्रपंच केल्यावर, परमार्थात जात असताना कांही गोष्टी नित्यनियमाने कराव्या लागतात, त्यातील पहिली गोष्ट म्हणजे प्रात:काळी हरिपाठ करणे होय.
हरिपाठ म्हणजे आनंदी जीवनाची सुरवात ती परमेश्वराचे आठवणीने, त्याचे रुप, त्याची भक्ती, त्याचे स्थान, त्याचे वैशिष्ठ्ये काय आहे हे पहाणे होय.
या गोष्टी प्रापंचिकाला सूर्योदयानंतर करणे शक्य नसते. त्याला इतर कर्तव्ये पार पाडावयाची असतात. ती त्याची पाठ सोडत नाहीत.
तेव्हा हरिपाठ सूर्योदयापूर्वीच करावा.
परमेश्वराचे चांगले गुण आपल्यात यावे या भावनेने नित्य नियमाने हा हरिपाठ करीत जावे.
हरिपाठ ज्ञानेश्वरांचा हरिपाठ, एकनाथांचा, नामदेवांचा जिद्दीने, भक्तीने, श्रद्धेने हरिचे कीर्तन, प्रवचन करीत रहाणे म्हणजे हरिपाठ.