हात

परमेश्वराची कलाकुसर अगम्य आहे. त्याने माणसाला दिलेल्या गोष्टी किती महत्वाच्या आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण त्याने दिलेल्या अवयवांचा विचार करु.

परमेश्वराने प्रत्येक माणसास दोन हात दिले आहेत. एक डावा हात दुसरा उजवा. दोन्ही हात कसे एकमेकाला सांभाळून घेतात हे मला प्रवचन करताना लक्षात आले.

एका एकी मला शिंक आली तसा माझा डावा हात खिशात जावून रुमाल काढून त्याने उजव्या हाताला दिला उजव्या हाताने तो तोंडा समोर धरुन माझी लाज राखली.

तेथे माझ्या लक्षात आले माणूस प्रपंचात असे वागेल तर त्याचा प्रपंच नक्कीच नेटका होईल.

येथे हाताने मला शिकवण दिली. हे दोन हात दिवसभर एकमेकांना हात उसने देत, घेत असतात. ते कधीही मी मोठा तू छोटा असे मानीत नाहीत.

सकाळी उठल्यावर उजवा हात डाव्या हातावर पाणी घालतो. तर दुपारी डावा हात उजव्या हातावर पाणी घालून ऋण  फेडतो. हातच शिकवितात कोणी मोठे (उच्च) नाही कोणी नीच नाही. एकमेका शिवाय कांही होत नाही.

हाताची पांच बोटे आहेत ती पण एकमेकांशी कशी जोडून आहेत. प्रत्येकाचे वेगळे महत्व आहे.

कोणी जर म्हंटले माझे शिवाय कुणाचे चालणार नाही तर तसे होत नाही.

प्रत्येकाचे जीवनात महत्व असते.

जसे अंगठा म्हणतो माझ्या सारखे कौशल्य इतरात नाही. क्षेपण विद्येत माझा  हात कोणी धरणार नाही.

तेवढ्यात अनामिका म्हणते माझ्या शिवाय खरे खोटे कळत नाही. मी कोणताही निर्णय पुराव्या सहीत देवू शकते तेव्हा मी मोठी.

तेवढ्यात मध्यमा म्हणते सर्वांनी मानले पाहिजे.

तेवढ्यात अनामिका म्हणते मला तर सर्वजण मानतात दोन जीवांचो जेव्हा मिलन होते तेथे माझ्या हातातील याच अनामिकेमध्ये अंगठी घातली जाते तेव्हा मीच मोठी आहे.

हे सर्वांचे बोलणे झाले हे सर्वांचे बोलणे झालो व त्या सर्वांनी करंगळीकडे पहात म्हंटले तू तर बुटकी तुला कोण विचारतो. तेव्हा आपले छोटेपण मान्य करुन ती म्हणाली उगाच भांडू नका .

परमेश्वराची आरती करताना दोन्ही हाताच्या करंगुळी एकत्र येतात नमस्कार होतो व एखादी गोष्ट साध्य करावयाची असेल तर माझीच मदत घेतली जाते.

तेव्हा आपण सर्वजण परमेश्वराचा लेकरे आहोत उगाच भांडत बसू नका.

आपण एकमेकांना साद घालत हात देवू.

हातामध्ये पण प्रकार आहेत.

कांही हात हातावर तुरी देवून फसवून जातात. कांहीजण त्यांना हात दाखवून धडा शिकवितात.

कांही जण गुन्हा शोधण्यात पटाईत असतात त्यांचा हात कोणी धरत नाही.

नवरा बायको हातात हात घेवून प्रपंचात प्रवेश करतात.

कांहीजण मात्र हाताने जेवढे देता येईल तेवढे देत देत आपले आयुष्य व्यतीत करतात.

हाताचा उपयोग अन्नग्रहणासाठी असतो. मात्र कांहीजणांचा तो अन्नाचा घास तोंडात घालण्याची वेळ येताच खाली पडतो तेव्हा आपण म्हणतो हाता तोंडाला आलेला घास पडला.

उपयोगी पडण्याची वेळ येताच त्याचा घात झाला.

यश संपादन केल्याने त्याचे कौतुक त्याच्या पाठीवर हात ठेवून करावयाचे असते.

गोरगरीबांनी केलेल्या कष्टाचे मोल त्यांच्या हातावर ठेवून करावयाचे असते.

त्या मजुरांचे पाठीवर कितीही मारा पण त्यांचे पोटावर मारु नका.

हात हे परमेश्वराची प्रार्थना करणेसाठी आपणास दिले आहेत.

एका हाताने प्रार्थना होत नाही. जेव्हा दोन्ही हात एकत्र येतील तेव्हाच खरी प्रार्थना होते व तीच प्रार्थना परमेश्वर प्राप्ती करुन देते. जीवनाला आनंदी करते.

Leave a comment