गुरुपौर्णिमा

गुरुपौर्णिमा या उक्तीचा विचार करता त्यामध्ये गुरु व पौर्णिमा असे दोन शब्द येतात.

गुरु म्हणजे सद्गुरु, देवगुरु, जगद्गुरु. तसेच पौर्णिमा म्हणजे संपूर्ण रुपात जी माँ असते ती पौर्णिमा होय.

गुरुचा विचार करताना गुरुचे महत्व या श्‍लोकात सांगतिले आहे.

गुरूर्ब्रह्मा गुरूर्विष्णुः गुरूर्देवो महेश्वरः।
गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।।

अशा गुरु शिवाय कोण आपणाला वाट दाखविणार आहे.

गुरुबीन कौन बताये वाट!

तेव्हा अशा गुरुंना गुरुपौर्णिमे निमित्त वंदन करुया.

गुरु बिना ज्ञान नही, ज्ञान बिना आत्म नही!

ज्यांनी मला घडवलं, जीवन जगायला शिकवलं अशा प्रत्येकाला मी गुरु मानतो त्यांचा मी ऋणी आहे.

लहान मोठ्या सर्व गुरुंनी कळत न कळत मला खूप काही शिकवलं अशा सर्वांना मी वंदन करतो.

पहिला गुरु आई असते, मग ताई, दुसरा गुरु म्हणून समोर येते शालेय शिक्षण, व्यवहाराचे ज्ञान देण्यात शिक्षक हा तीसरा गरु होय.

पुस्तक वाचनाची गोडी लावणारा, पुस्तक रुपाने अनुभव देणारा तो पण गुरुच असतो.

व्यवहारात मित्र मैत्रिणीच्या रुपात सामावणारा, हसत खेळत शिकवून जाणारा, नोकरीत कसे वागावे हे शिकवणारा पण गुरुच असतो.

मोठेपणी अनुभवाचे बोल सांगणारा लहान मुलांचे रुपाने वेगळी दृष्टी देणारा गुरुच असतो, तर आध्यात्म मार्गात नेऊन मोक्षाची वाट दाखविणारा गुरुच असतो.

कळतेपणी शिकवणारा, न कळतं शिकवून जाणारा गुरुच असतो.

गुरु कसाही असो कुठेही असो जीवन सुकर करतो. जगायची दृष्टी देतो, सकारात्मक बनवितो, अनुभवाने समृद्ध करतो तो गुरु होय.

खरं तर स्वत:ला स्वत:चे गुरु कधी होता येत नाही, तेथे अहंकार उत्पन्न होतो.

पण आचरणात आलेल्या मुळ स्वभावधर्माने इतरांशी ममतेने, स्नेहाने आणि सद्भावनेने वागणारा प्रत्येक जण आपला गुरु असतो.

बाह्य जगातील गुरु आपलं बोट धरुन चालायचं कसं एवढं शिकवितात. पण चालायचं असतं आपणचं.

त्यासाठी आपल्या मनांत बीज रुजवायचं असतं, सत्कर्म करण्याचं. या सर्व गोष्टींची आठवण करुन देते ती गुरु पौर्णिमा होय.

गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. ज्या व्यासांनी पुराणे, महाभारत लिहिले त्यांना मी वंदन करतो, त्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय.

जो जो जयाचा घेतला गुण.. तो म्यां गरु घेतला जाण ।

सद्गुरु अंगीकरणासाठी, अनुकरण करण्यासाठी अवगुण, त्यागासाठी व ज्ञानप्राप्तीसाठी गुरु अशी गुरुंची प्रचिती सांगतात.

गुरु मधील ‘ग’ म्हणजे सिद्ध, ‘र’ म्हणजे पापांचे हरण करणारा, ‘उ’ कार म्हणजे विष्णुचे अव्यक्त रुप म्हणजे गुरु होय.

भगवान श्रीकृष्णाने गुरुच्या घरी लाकडे वाहिली, संत ज्ञानेश्‍वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु केले, नामदेवांचे गुुरु होते विठोबा खेचर.

याप्रमाणे भारतीय संस्कृतीत गुरुला पूजनीय मानले आहे.

पौर्णिमा याचा अर्थ प्रकाश. ज्या प्रकाशात अज्ञानरुपी अंध:कार नष्ट होतो, गुरुशिष्याला ज्ञानाचा प्रकाश देतो.

गुरु म्हणजे ज्ञानाचा सागरच होय. गुरुजवळ नम्र झाल्याशिवाय आपणाला ज्ञान मिळणार नाही. गुरुंनी सांगितलेल्या मार्गावर चालणे ही खरी गुरु पूजा होय.

सद्गुरु ठेवतील त्या अवस्थेत समाधानात रहाणे, त्यांचे इच्छेत आपली इच्छा मिसळणे, कोणत्याही परिस्थितीत नामस्मरण न सोडणे, नामावर, सद्गुरुवर श्रद्धा ठेवणे, सद्गुरुंचे अनुसंधान अखंड ठेवणे, त्यांना दृष्टी आड होवू न देणे.

जेथे आपले समाधान होते, संशय दूर होतात तेच आपले गुरु होत.

अशा सद्गुरुंचा आपणाला आधार वाटावा अशा सद्गुरुंची कृपा व्हावी यासाठी गुरुपौर्णिमेला त्यांचे सानिध्य साधावे, ही प्रार्थना👏.

Leave a comment