भारतीय संस्कृतीमध्ये जे महत्वाचे सण सांगितले आहेत त्यांत दिवाळी हा प्रमुख सण होय.
अश्वीन महिन्याचा शेवट तर कार्तिकाची सुरवात या सणामध्ये असते.
लहानापासून मोठ्या पर्यंत सर्वजण या सणाची वाट पहात असतात.
परमार्थात पण या सणाची मोठी धमाल असते. असे हे प्रपंच व परमार्थ यामध्ये होणार्या दिवाळीचे वर्णन एका कवितेतून केले आहे.
ती अशी –
देहाच्या पणतीत नामाचे तेल,
जाळून टाकील वासनांचे खेळ.
त्रिगुणांचे रवाळ लाडू भक्तीच्या घालून पाकात,
सदिच्छांची शंकर पाळी तळून आनंदाच्या तुपात.
अहंकाराच्या करंजीला घालून सुंदर मुरड,
कोसळेल क्षणात मोहाची अवघड दरड.
इंद्रियाचे करुन संयमन साजरे होईल गोवर्धन,
अर्पून अवघे तन मन धन.
बुद्धीरुपी वाहून सुमन सद्गुरु भेटता ऐशी करु सुंदर गुरुद्वादशी,
धन विद्या रुपी चढवू साज धनोत्रयोदशी होईल.
खास काम क्रोध रुपी असुरांना संयमाने करु ठार,
नरक चतुर्थी केली साजरी म्हणून केवढी येईल बहार.
पंचकर्म पंचप्राण मन आणि पंच ज्ञानेंद्रिय मिळुनी,
सोळा ठेवूनी भक्ती भाव भोळा करु विद्येचे पूजन.
तेच खरे लक्ष्मी पूजन.
कुटस्थाचे होईल ज्ञान तोची असे पाडवा छान.
जन्म मृत्यू वरी विजया साजरी ती यमद्वितीया,
काढता अविवेकाची काजळी होईल अद्भूत अन् निराळी.
लक्ष लक्ष दीप उजळीत आली दिवाळी आली दिवाळी,
करुया स्वागत दिपोत्सवाचे.