एका व्यक्तीने मला प्रश्न केला डॉक्टर, दगडामध्ये देव असतो का?
मला तेथे एक उक्ती आठवली, भाव तेथे देव.
मी लगेच त्याला ती उक्ती सांगितली व विचार करु लागलो. खरच भाव, श्रद्धा असेल तेथे देव असतो का?
याबाबत स्वामी विवेकानंदांना एकाने प्रश्न केला. लोक काय मूर्ख आहेत, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात. मला तर हे थोतांड वाटत आहे. या जगात देवाचे अस्तित्व असल्याचे जाणवत नाही. तेहतीस कोटी काय पण एकही देव या जगतात अस्तित्वात नाही. सगळे थोतांड आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीत असतो?
विवेकानंदांनी इकडेतिकडे पाहिले व भिंतीवर अडकवलेला फोटो कुणाचा आहे असे विचारले. साधकाने तो फोटो वडीलांचा असल्याचे सांगितले. तो फोटो भिंतीवरुन काढून जमिनीवर ठेवण्यात आला व सांगितले या फोटोवर थुंका, तेव्हा साधक म्हणाला, वडीलांचे फोटोवर मी कसा काय थुंकू शकतो. साधकाचे बोलणे ऐकून विवेकानंद म्हणाले, अरे तो फोटो म्हणजे कागद आहे. तो फोटो म्हणजे तुझे वडील थोडेच आहेत. तेव्हा साधक म्हणाला या फोटोमध्ये मी माझे वडील पहात आहे, मी त्यांचा अपमान करु शकत नाही.
तेव्हा विवेकानंद म्हणाले जसे श्रद्धेने तुम्ही या फोटोमध्ये तुमच्या वडीलांना पहाता तसेच प्रत्येक व्यक्ती , मूर्तिमध्ये परमेश्वर पहात असते. त्या मूर्तीमध्ये त्याची अपार श्रद्धा असते . तेव्हा देव (परमेश्वर) कणा कणामध्ये भरलेला आहे. कुणाला तो मातेच्या चरणामध्ये दिसतो, तर कुणाला दीन दुबळ्या मध्ये दिसतो.
जे का रंजले गांजले,
त्यांसी म्हणे जो आपुले,
देव तेथेची जाणावा,
तोची साधू ओळखावा.
देवाबद्दल अंधश्रद्धा मुळीच ठेवू नका, मात्र देवांवर (जगत्नायकावर) श्रद्धा मात्र जरुर ठेवा.
देव जाणून घेण्यासाठी पैसा लागत नाही, तर खरा भक्तिभाव लागतो. तेथे म्हटले जाते, भाव तोचि देव.
तेव्हा साधक हो आता तुम्ही विचारणार नाही दगडात देव असतो का? श्रद्धा भक्ती ठेवून दगडाचा स्विकार करा, त्यातून देवाची सुंदर मूर्ती साकार करा. ही मूर्ति निर्माण करण्याचे कार्य म्हणजे चारित्र्य होय.
ज्ञान, दर्शन व चारित्र्य याचे साह्याने साधकाने दगडातून मूर्तिची निर्मिती करावयाची आहे.
घड्याळाच्या गजराचे काम आपणाला जागे करणे. जागे होणे हे आपले काम आहे.
श्रद्धा – भक्ति असेल तर ते काम नक्कीच होईल. पुन्हा तीच पंक्ती सांगतो.
भाव तोची देव, भाव तेथे देव..
यासाठी मंदीर बनविल्या नंतर देवाची प्रतिष्ठा केली जाते. उत्सव केला जातो, त्या परमेश्वराचे गुण गायले जातात. त्याची सर्वांच्याकडे समभावाने बघण्याची दृष्टी त्या नेत्रात ओतली जाते. हे सर्व भाव आहेत. कारण तोच देव त्याचे दर्शन घेतल्याने ते भाव आपणाकडे परावर्तीत करतो.
या प्रमाणे सर्वाभूती परमेश्वर दगडामध्ये पण आहे. त्याचे सतत चिंतन, मनन, नामस्मरण करा…
1 Comment
सौ. शीला केतकर
भाव तोची देव
खरे आहे.
न देव: वर्तते काष्टे
न पाषाणे न मृण्मये
भावे ही वर्तते देव.
भगवंतावरील श्रद्धा हाच भाव 🙏 विवेकानंदांचे उदाहरण परफेक्ट 🙏 राम कृष्ण हरी हरी🙏