अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे, आता चरणी जगन्नाथा चित्त ठेवले.

संतांची, साधकाची परमेश्‍वराबद्दल असणारी भावना ज्ञानराज माऊलींनी आपल्या हरिपाठात दर्शविली आहे.

या जगात आनंदी आनंद कोठे आहे असे विचारले तर त्याचे उत्तर एकच येईल आणि ते म्हणजे परमेश्वरा तुझे चरणाशी.

तो आनंद त्रैलोक्यात कोठेही सापडत नाही. तू जसा त्रैलोक्यात भरून आहेस, तसा आनंदपण तुझ्या चरणापाशी भरुन आहे, त्यामुळे तुझे चरण ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आनंद आहेच आहे.

तु म्हणजे तुझे नामस्मरण. ते जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी करीत गेले तर त्याची अनुभुती येते.

तेव्हा एकदा कां तुझे चरण सापडले तुझा आश्रय मिळाला की मला कोणत्याही परिस्थितीत रहाण्यात दु:ख होणार नाही.

यासाठी परमेश्‍वरा तुझे नामस्मरण सतत माझेकडून करवून घेवो.

या जगतात आई, वडील यांचे रुपांत वावरत असणार्‍या तुझ्या रुपाला मी त्रिवार वंदन करतो.

प्रत्येकाच्या जीवनांत चैतन्याची जागृती करणारा तू खरोखर एकच एक विधाता आहेस. त्यामुळे तुला कोटी कोटी वंदना.

एका नामाच्या किल्लीने त्रैलोक्यात पसरलेल्या तुझ्या भांडाराचे कुलूप खोलले जाते, त्या नामाला (किल्लीला) मी माझ्या ह्रदयाच्या गुहेत ठेवले आहे. याचा विसर मला होवू देवू नकोस.

हे परमेश्‍वरा तू सर्वांचा रक्षण करता आहेस. तुझ्या जवळ श्रीमंत गरीब असा भेद नाही. तू अनाथांचा नाथ, रक्षक आहेस, तेव्हा तुझ्यावर मी विश्‍वासाने श्रद्देने माझे जीवन अर्पण करीत आहे.

यापुढे मल तू जसे ठेवशील त्यात मला समाधान आहे. आनंद म्हणजे काय हे सांगता येत नाही. पण तुझ्या पायाशी आल्यावर त्याची प्रचिती येथे हे खरे. या त्रिभूवनांत जेथे जेथे आनंद आहे, तेथे तेथे तू आहेस हे नक्की म्हणून तुझ्या चरणापासून मला दूर करु नकोस.

आता देखिले चरण – आता उठावेसे नाही वाटत देवा.

असे ज्ञानेश्‍वर माऊली वरचेवर म्हणतात.

Leave a comment