तिथी मध्ये पौणिमा-आमावस्येच्या आगोदर येणारी तिथी म्हणजे चतुर्दिशी होय.
या सर्व तिथीत चतुर्दशी अत्यंत महत्वाची, मुहुर्ताची चतुर्दशी म्हणजे अनंत चतुर्दशी होय.
अनंत हे गणेशाचे नांव आहे. गणेश हा सकळ देवांचा देव आहे व त्याला स्मरुन केलेले काम हे दशदिशांना प्रसिद्ध होते. त्यातून साधकाला चांगल्या गतीचा लाभ होतो. या दिवशी सुरु केलेल्या कामाची ख्याती अपरिमित पसरते. सर्व जगतात त्या कार्याला प्रसिद्धी मिळते.
जीवनात चांगल्या चार गती प्राप्त व्हाव्यात. असे काम करावे की त्याची किर्ती दशदिशेला पोहचेल. अशा कामाची सुरवात चतुर्दशीला करावी.
गणरायाने चतुर्थीला आगमन करुन तुमच्या जीवनाची तपासणी केली, तपासणीचे दहा दिवस संपले, आता तुमच्या प्रगतीवर आपले मत गणराया देणार आहे.
आपण या निकालाची वाट पाहत असतो त्या दिवशी त्याने दिलेला निकाल पाहून आपण हर्षभराने नाचत, गाजत आनंद व्यक्त करीत असतो तो आनंदाचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी होय.
प्रत्येक सण कांही गोष्टी शिकवून जातात व जीवनाला वळण देवून जातात. या दृष्टीने आपण सणांकडे पाहिले पाहिजे.
परमार्थात आपली हृदयशुद्धी, मनशुद्धी, क्षमावृत्ती, शालीनता, विवेक जागृती, ब्रम्हचर्य पालन, अपरिग्रह या गोष्टी साधाव्यात म्हणून हे सण आपण करीत असतो. हा भाव जरी मनांत ठेवला तरी खूप मोठे काम होईल.
सर्वांमध्ये असून कशाला ही चिटकून न रहाणे, असा भाव प्रपंच करीत असताना ठेवावा. जेथे जाऊ तेथे त्याप्रमाणे वागू अशी कृती करता आली पाहिजे. तरच तो या जगाच्या नाटकात नटसम्राट होईल.
यासाठी चतुर्दशीला तुम्ही चिंतनातून ध्येय नक्की करा. त्यावर सखोल अभ्यास करा. त्या ध्येयाशी समरस व्हा. तुम्ही नक्कीच तुमच्या कर्तृत्वाची किर्ती अनंतात तसेच दशदिशेला पसरवाल यात शंका नाही.
जागे व्हा मुहुर्त टाळू नका. अनंत चतुर्दशीचा.