आनंदी साम्राज्याचे चक्रवर्ती सम्राट

ही सर्व सृष्टी, हे सर्व साम्राज्य ज्या र्ईश्‍वराचे आहे, तो ईश्‍वर आनंदी जीवनाचा  चक्रवर्ती सम्राट आहे. तोच करता आणि करवीता आहे.

त्याच्या साम्राज्यात सर्वजण सुखी समाधानी आहेत. आपणाला पण त्या साम्राज्याची सफर करावयाची आहे ,त्या सफरीच्या कल्पनेत मी रंगून गेलो आहे. धुंद झालो आहे.

मला दुसरे कांही सुचतच नाही. तुझ्या भक्तिने मी वेडापिसा झालो आहे. तुझे नाम घेत मी तुझे किर्तन करीत आहे. तुझी स्तुति करीत आहे. तुझा जयजयकार करीत आहे.

त्यातून मला अद्भूत शक्ती मिळत आहे.. माझ्या शरीरात आनंदरुपी पूर येत आहे. प्रेमरुपी लाटा त्या पूरात उसळत आहेत. त्या उसळत्या लाटांनी माझे मनातील भय पूर्णपणे  निघून गेेले आहे. त्यामुळे माझे तोंडी सतत तुझे नाम आहे.

आता आयुष्याचे शेवटी आमचे हेच काम आहे. तोंडाने तुझे नाम घेऊ, टाळी वाजवत एकमेकांना सुखी करत जीवन जगत जाऊ.

सर्वप्रकारे विचार करुन आता मी निर्धार करीत आहे. तुझ्या शिवाय इतर कोणाची संगत नको. सर्व संग परीत्याग करुन तुझ्या चरणाशी सेवा करण्यासाठी यावे अशी माझी भावना झाली आहे.

प्रपंचात थकलो भागले तरी तुझ्या अंगणात येण्यासाठी लोटांगण घालीत येण्याची मी तयारी करीत आहे. तुझे अंगण पहाण्यासाठी माझे डोळे आधीर झाले आहेत. तुझ्या अंगणातील आनंद हा ब्रम्हांडात पण पुरुन उरेल. ब्रम्हांडापेक्षा श्रेष्ठ आहे. यापेक्षा त्या आनंदाचे वर्णन मी काय करु.

संत संगतीत माझ्या जीवनाचा उत्तारार्ध व्यतीत होत आहे  याचा आनंद मला होत आहे, यापेक्षा परमेश्‍वरा मला दुसरा आनंद नाही.

त्याच आनंदात मी गात आहे, मनामध्ये मांडे रचित आहे, सुखाच्या राशी जोडीत आहे. हा आनंद आम्ही पोटामध्ये साठवत आहोत व त्याच्या आधाराने प्रपंचाचा प्रवास करीत आहोत.

असे आमचे जीवन अमृताप्रमाणे कीर्तन करीत करीत आम्ही व्यतीत करीत आहोत. त्यामध्ये संतांची साथ आमच्या बरोबर आहे. त्यामुळे जीवनात निर्भय होवून, आनंदाने नाचत गात, तुझ्या चरणाशी मी येत आहे.

Leave a comment