आपल्या घरातच स्वर्ग उतरु द्या

स्वर्ग, स्वर्ग म्हणजे काय ? स्वर्ग म्हणजे आनंदी वातावरण, विनासक्त ऐश्वर्य, सर्वत्र सुख समाधान.

असा स्वर्ग आपल्या घरात कसा उतरेल त्याला हे म्हणणे पटेल.

आपल्या घरात स्वर्ग उतरु द्या ही एक जेष्ठाची भावना आहे. प्रपंच करुन सर्व गोष्टी साध्य करुन समाधानी वृत्तीने जीवन जगणारा परमार्थात साधक म्हणून असणारा जेष्ठ अशी अपेक्षा करतो.

माझा सर्व प्रपंच चांगला झाला आहे तेथे कशाची कमतरता नाही. सर्वत्र आनंदी आनंद आहे. याचाच अर्थ माझ्या घरात-कुटुंबात स्वर्गच उतरला आहे. अशी भावना खरोखर श्रेष्ठ होय.

आयुष्यभर आपण कर्म करीत रहातो पण केलेल्या कर्माकडे वळून नजर टाकत नाही. ज्यावेळी त्याचे लक्ष कर्मफळाकडे जाते व कुटुंबात असणारे आनंदी माता-पिता, भावंडे, बहिणी आनंदाने एकत्र रहाताना दिसतात तेव्हा त्याचे अंत:करण भरुन येते त्याला स्वर्गच आपल्या घरात उतरल्याचा भास होतो.

याउलट जेथे या सर्वांचा अभाव असतो तेथे नरकवास वाटतो.
प्रेम – हे स्वर्ग गाठण्याचे उत्तम साधन आहे. तेव्हा कुटुंबात प्रेम ठेव तरंच घरात स्वर्ग उतरेल.

प्रेम हे पावसासारखं असतं. पेरणी केल्यावर पाऊस पडला तर पीक उत्तम येते पाऊस पडलाच नाही तर पीक जळून जाते. तेव्हा घराला स्वर्ग बनविण्यासाठी प्रेम रुपी पाऊस घरावर पडावा लागतो.

हे प्रेम म्हणजे कुटुंबाची ताकद होय. एकीचे बळ श्रेष्ठ समजतात एकीमुळे घरात स्वर्ग उतरतो

क्षमा वीरस्य भूषणम्।

क्षमा भाव मनामध्ये असणे व त्याप्रमाणे क्षमा याचना व क्षमादान करणे म्हणजे आनंदाला घरात आमंत्रण केल्यासारखे होते.

स्वर्गाला सीमा नाही स्वर्ग म्हणजे अभंग आकाश तेथे सर्व काही समावून जातात.

त्याप्रमाणे आपले घर मोठे ठेवा तेथे येणार्‍याला मोकळीक, आनंद, समाधान वाटेल त्या घरांत स्वर्ग उतरला असे वाटेल.

स्वर्गाला आमंत्रण दिले तर त्याच्या कांही अटी आहेत त्या समजावून घ्या

1) अडचणीत असणार्‍या दिन दुबळ्यांनी आश्रय मदत करण्याची वृत्ती ठेवा

2) घरात रामाची मूर्ती ठेवा ज्या रामाने पित्याच्या आज्ञेला शिरसावंद मानून चौदा वर्षे वनवास उपभोगला

3) सीतेसारखे चारित्र्य असु द्या. लक्ष्मण सारखी भावा भावातील एकी ठेवा तरच तुमचे घरात स्वर्ग उतरेल.

4) विश्वास, संवाद व वेळेला मदत करण्याची भावना म्हणजे स्वर्गाला घरात येण्याचे आमंत्रण होय. तेथे स्वर्ग आनंद व प्रेमाला घेऊन उतरतो.

ज्या घरामध्ये वृद्ध आई-वडील यांची नित्य सेवा चौकशी केली जाते तेथे स्वर्ग उतरल्या शिवाय रहात नाही.

ज्या घरामध्ये अतिथी देवो भव असे वातावरण असते तेथे स्वर्गाची आरास सुरु होते. आलेला अतिथी तृप्त होतो आनंदी होतो.

साधकासाठी स्वर्गाच्या दाराची चौकट लावली जाते. घराला चौकटीची गरज असते तसे स्वर्गाला घरात येण्यासाठी या चौकटीची सोय करा. स्वर्ग आपोआप त्या चौकटीतून तुमचे घरात पदार्पण करेल.

Leave a comment