आध्यात्म यात्रा

यात्रा या अनेक प्रकारच्या आहेत. जसे तीर्थयात्रा, विजय यात्रा, पदयात्रा. यात्राचा अर्थ प्रवास तसे आध्यात्म यात्रा याचा अर्थ आपल्या स्वत:चा प्रवास. प्रवास कोठून तरी सुरु होतो व तो कुठेतरी थांबतो. मनुष्य जन्म घेतो तेथे त्याचा आध्यात्म प्रवास सुरु होतो. मी कोण आहे? मी कोठे आहे? मला कशासाठी जन्माला घातले व मला कुठे जायचे याचा विचार म्हणजे आध्यात्म यात्रा होय. मनुष्य जन्माला आल्यापासून आयुष्यात निरनिराळ्या धर्मस्थळांच्या यात्रा करतो. कारण त्याला त्या ठिकाणी परमेश्‍वराचे स्वरुप पहावयाचे असते. तो कसा आहे हे कळण्यासाठी त्याची यात्रा चालू असते.
या सर्व गडबडीत प्रथम मी स्वत: कोण आहे? याची त्याला ओळख नसते. ती करुन घेणे हा आध्यात्म यात्रेचा प्रयत्न आहे. मी कोण आहे या शंकेने या आध्यात्म यात्रेची सुरुवात होते व मी ज्ञान व आनंद भरुन आहे या अनुभुतीने ती यात्रा समाप्त होते. आपण मात्र जन्म दिला म्हणून जगतो. दिसेल त्या वाटेने जातो व आयुष्य संपवतो. आपण दुसत्यांना ज्ञानाच्या गोष्टी शिकवतो. पण आपल्या आचरणात त्या गोष्टी दिसत नाहीत. हा मोठा दोष मानवामध्ये दिसतो. हा दोष समजून घेणे व त्याप्रमाणे आचरण ठेवणे याला आध्यात्म याचा म्हणतात.
या यात्रेचे आपण सर्वजण यात्रेकरु आहोत. साधूसंत हे आपणास या यात्रेच्या गाडीत बसविण्याचे काम करतात. पण योग्य ठिकाणी उतरुन यात्रेचा कार्यभाग सिद्ध करण्यासाठी श्रावकानेच प्रयत्न करावयाचा असतो. ज्या साधकाने हा प्रयत्न केला त्याची यात्रा सफल झाली अन् ज्यांना तो प्रयत्न करता आला नाही, त्यांची यात्रा अंतयात्रा झाली असे म्हणावे वाटते.
देवाच्या मंदीरा नांदे सुख शांती, भक्त जनांची चाले भक्ती, कोणी करती प्रभुची आरती, नाही ईर्षा नाही द्वेष, गळून जाई वैरभाव, इथे दरवळे प्रिती सुगंध, मन जाई रंगुनी, आत्मानंदी मांगल्याची इथे प्रचिती, प्रभुरायाचा करता संगती, उरे म चिंता सरते भिती, शुद्ध भाव ते मनी उतरती या सर्व शुद्ध भावाची प्रतिची अंतमनांत व्हावी. या आध्यात्म यात्रेचा उद्देश आहे. आपण मात्र त्या आत्म्याकडे पहात नाही. तो आपल्यातच भरुन आहे. जसे दिवा सर्वत्र उजडे देतो पण त्याच्या खाली अंधार असतो, म्हणून म्हणतात. दिव्या खाली अंधार यासाठी तो अंध:कार नष्ट होण्यासाठी आपण एकदा तरी ही आध्यात्म यात्रा करावी ही इच्छा.
ही यात्रा एकट्याने एकांतात जावून करावयाची असते. प्रपंचात राहून ही यात्रा सफल होत नाही. उत्तम प्रपंच करुन झाल्यावर कुणाला न दुखवता सर्व विकारावर प्रभुत्व संपादन करुन ही यात्रा करावयाची असते. या यात्रेचे फळा फार मोठे आहे. तेव्हा निरपेक्ष भावाने या यात्रेत सहभागी व्हा व जीवनाच्या किनार्‍यावर कृतार्थ बना…

Leave a comment