प्रत्येक घराला एक दार असतं.
तुम्हा आम्हाला ते सताड उघड असतं,
त्या दाराचे नातं आई-बाबा असतं,
उबदार विसाव्याचं ते एकमेव स्थान असतं,
आपली वाट बघणार घराला एक दार असतं.
या वाट पहाणार्या दाराला अस्थेचं महिरपी तोरण असतं,
घराच्या आदरतिथ्याचं ते एक परीमाण असतं,
नितीमत्तेच्या उंबर्याआड मर्यादेचं त्याला भान असतं,
असं प्रत्येक घराला वाट पहाणारं दार असतं.
दारिद्रयाच्या दशावतारात हे दार कधीच मोडत नसतं,
कोत्या विचाराच्या वाळवीनं ते कधी सडत नसतं,
ऐश्वर्याच्या उन्मादात ते कधी फुगत नाही,
असे प्रत्येक घराला वाट पहाणारं एक दार असतं.
सुना, नातवंडांच्या आगमनाला ते तुकडापाणी घेवून सज्ज असतं,
लेकीची पाठवण करताना अश्रुना वाट करुन देतं,
व्यसनात अडखळणार्या पावलांना ते जरबेने ताळ्यावर आणतं,
असं प्रत्येक घराला वाट पहाणारं एक दार असतं.
मित्रहो उभ्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट जपा,
उपहासाची करवत या दारावर कधी चालवू नका,
मानापमानाचे छन्नी हातोडे या दारावर कधी मारु नका,
स्वार्थी अपेक्षांचे खिळे या दारावर ठोकू नका,
घराचं रक्षण करण्यार्या या दाराला कधीच मोडखळीस अणू नका,
कारण ते वाट पहाणारं घराचं एक दार असतं.
खरचं त्या दाराच नाव आई-बाबा असतं.
प्रपंचात सर्व ठिक ठाक असावं म्हणून या दाराला फार किंमत असते,
परमार्थात मात्र वेगळं असतं,
तेथे ते दार सताड उघडं असतं,
परमार्थाला दार नसतं,
तेथे शनिशिंगणापूर चे स्थान असतं,
जो प्रपंच उत्तम करतो, त्याला आई-बाबांचा आशीर्वाद असतो तो आशीर्वादाचे साधकाला परमार्थाचे मंदीरात घेवून जातो.
तेथे त्याला कोणी अडवत नसतं, त्याची जात कोण पहात नाही,
कारण तेथे दार नसतं ते घर सताड उघडं असतं. ते भगवंताच मंदीर असतं.