रडत जन्माला आलेल्या माणसाला हसत हसत मरण येणे म्हणजे तो स्वर्गवासी झाला असे म्हणावे.
जन्म आणि मृत्यू या दोन घटना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ठरलेल्या आहेत. जन्म आणि मृत्यू यामधील अंतर म्हणजे जीवन होय.
या जीवनात अनेक प्रसंग येतात, दु:खाला सामोरे जावे लागते. पण या सर्वावर मात करुन हसत मुखाने, आनंदाने जो हे ‘मी’पणाचे जीवन संपवितो तो खरा स्वर्ग मार्गाचा प्रवासी होतो.
‘माझ्या’ जीवनातील कार्यामुळे सर्वांचे कल्याण झाले सर्वत्र सुख शांती, समृद्धी आली तर ‘माझे’ मरण हे खरे जगण्यासारखे होईल. ‘मी’ अमर होईन.
अशा प्रकारे जगलेले अनेक संत महंत आपण पहातो. त्याचे निर्वाण होवून आज अनेक वर्षाचा काळ गेला आहे, पण त्यांची आठवण जात नाही.
त्यांच्या आठवणीने त्यांना भेटण्यासाठी आजही त्यांचे नावाची पायवारी अखंड चालू आहे. तेथे सर्वत्र आनंदी आनंद आहे. तेथे प्रत्येकजण आपला ‘मी’ पणा सोडून प्रपंचातील विषयाची आसक्ती सोडून एकमेकांना भेटत आहे.
आनंदाचा ठेवा बरोबर घेवून जात आहेत. त्यांनी घेतलेल्या समाधीमुळे दिलेल्या उपदेशामुळे सर्व वारकरी आनंदात स्वर्गसुख अनुभवत आहेत.
येथे लक्षांत येते ‘मी’ मरणात खरोखर जग जगते. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग म्हणजे जीवनांत आनंदी रहाणे.
‘मी‘ला विसरा, कोणत्याही प्रसंगात आनंदी रहा, तेथे तुम्हाला स्वर्गसुख मिळेल.