फले चुनरी

फले चुनरी हा जैन धर्मातील शब्द प्रयोग आहे. याचा सरळ अर्थ असा- हृदयापासून ज्या गोष्टीमुळे आनंद प्रकट होतो तो प्रकट होणारा दिवस.

ज्या आनंदामुळे समाजात गावांची, व्यक्तीची प्रतिष्ठा वाढते त्या निमित्त जो प्रसाद वाटला जातो तो दिवस म्हणजे फले चुनरी.

राजस्थानी लोकांमध्ये या दिवसाला, या उत्सवाला फार महत्व दिले जाते. एखाद्या गावामध्ये भगवंताची प्राणप्रतिष्ठा होते. मंदीर बांधले जाते. आठ दिवसाचा प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा होतो. भगवंत या यज्ञातून त्या गावामध्ये प्रतिष्ठित होतात. त्यांची कृपादृष्टी त्या गावावर होते अशा प्रसंगी जो आनंद होतो तो खरा अत्त्युच्च आनंद.

त्या प्रित्यर्थ प्रसादाचे वाटप करण्याची जी कृती तिला फले चुनरी म्हणतात.

भगवंताचे प्राणप्रतिष्ठा उत्सवाचा हा अखेरचा दिवस असतो.

सर्व समाज त्या ठिकाणी जमलेला असतो. ईतर संघ पण या उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले असतात. सर्वाचे मनामध्ये या प्राणप्रतिष्ठेचे प्रेम असते.

समाजातील एकादा श्रावक हे प्रेम प्रदर्शीत करण्यासाठी या यज्ञाचा प्रसाद म्हणून सकल संघाला, सर्व समाजातील लोकाना त्या ठिकाणी आमंत्रात करीत असतो व प्रसादाचे वाटप करतो.

हे प्रसादाचे आमंत्रण देण्यासाठी एक पद्धत अवलंबन केली जाते.

गावामध्ये उंच अशा झाडावर भरजरीचा शालू टाकला जातो तो शालू पाहून सर्वांना या प्रसादाचे आमंत्रण मिळते व सर्वजण येवून प्रसाद घेवून जातात. तेथे हा श्रीमंत हा गरीब असा भेद नसतो.

परमेश्वरी प्रसाद सर्वांना मिळावा ही भावना त्यामागे असते या प्रसादाच्या माध्यमातून श्रावक आपली भावना परमेश्वराजवळ प्रकट करतो.

सर्वांना सुखी ठेवा, दुष्ट प्रवृतींचा नाश होवो, सर्वांना शांती सुख लाभो.

त्यामुळे या प्रसादाला कोणी डावलत नाही. त्याचा भक्तीने आदराने स्विकार करतात.

असा हा गर्व वाटावा असा दिवस म्हणून त्याला फले चुनरी म्हणतात.

Leave a comment