गृहस्थाश्रमी माणूस जीवनांत कांही ना काही व्रत घेवून जगत असतो.
आडाणी-श्रद्धाळू माणसे परमेश्वरावर श्रद्धा ठेवून नित्यनियमाने त्याची पूजा, आरती, किर्तन करीत असतात. काहीजण सोळा सोमवारचे व्रत घेतात. कांही स्त्रिया मंगळवारचे व्रत घेतात.
कांही साधक दत्तगुरुरायाचे गुरुवारचे व्रत घेतात. तर कांहीजण शुक्रवारच्या व्रताचे पालन करतात.
पुष्कळ भावीक मारुती रायाला प्रसन्न करणेसाठी शनिवारचे व्रत घेतात.
साधक आपल्या व्रताप्रमाणे त्या त्या वारी परमेश्वराच्या (आरध्य दैवताच्या) सानिध्यात रहाण्याचा प्रयत्न करतात.
कांहीजण मात्र उपवासाचे चांगले पदार्थ खावयास मिळतात म्हणून व्रत करतात.
व्रत याचा अर्थ आचरण-वृत्तीने मनाने ठरविल्या प्रमाणे जसे आचरण करतो त्याला व्रत म्हणतात.
या आचरण पद्धतीच्या मुळाशी काय आहे हे पाहणे गरजेचे वाटते.
प्रथम आपण व्रताचे प्रकार पाहू.
प्रकार पहिला – आरध्य दैवताला प्रसन्न करण्यासाठी त्या दैवताचा वार असलेल्या दिवशी त्याचे सानिध्य ठेवायचे. पूजा-आर्चा-कथा किर्तन यामध्ये दिवस व्यतीत करावयाचा.
दुसरे व्रत म्हणजे मौन व्रत, वाणी म्हणजे तोंड त्या तोंडाने बोलता येते व खाता येते पण या खाण्या, बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा या व्रतामुळे काम, क्रोध, मोह, माया यावर आपण ताबा मिळवू शकतो जो या मौन व्रताचा प्रयोग करतो त्याला समाजात प्रतिष्ठा प्राप्त होते. त्याचा शब्द सर्वजण फुलासारखे झेलतात.
नैसर्गिक रित्या घडत असणार्या कोणत्याही गोष्टीला दूषण देत बसण्यापेक्षा ज्या गोष्टी घडत आहेत त्या तशाच घडू द्यायच्या आपण शांत राहून त्याकडे पहात रहावे हे पण एक व्रतच आहे.
इतरांकडून किंवा इतर प्राणीमात्रांकडून होणार्या आघाताला त्यांना दोष देवू नये.
दोष आपल्या प्रारब्धाचा (नशीबाचा) आहे असे समजून त्या घरणेकडे पहावे.
इतरांकडे खोटेपणाने पहाण्याऐवजी विशाल दृष्टीने पहाण्याचा सराव करावा.
इतरांचे दोष पहाण्या पेक्षा त्यांचे गुण पहावे व त्याचे गुणांचे कौतुक करावे ही गोष्ट सुद्धा ते व्रत घेतल्याशिवाय साध्य होत नाही.
त्याचप्रमाणे एखादी अवघड समस्या समोर आली तर आपण त्या समस्येला सामोरे जायला सक्षम नाही असा भाव मनांत ठेवू नये.
सकारात्मक होण्यासाठी सकारात्मकतेचे व्रत घेणे गरजेचे आहे. यामधून आनंद मिळविण्यासाठी लागणारे मोठे मन तयार होईल.
मी मोठ्या मनाचा होणे हे माझे कर्तव्य आहे. असे वागणे ही गोष्ट व्रत घेतल्याशिवाय साध्य होत नाही.
इतरांचे दु:खात सुखात आपण त्याचे ठिकाणी आहोत ही भावना निर्माण होणे अडीअडचणीत असणारांना, दु:खात असणारांना होणार्या वेदनांची दखल ज्याला घेता येते तो खरा व्रतधारी समजावा.
असा व्रतधारी जीवनात यशस्वी होतो परमेश्वराचा आवडता सेवक होतो अशी आहे ही व्रत व व्रतसंकल्पना.