कृतार्थ

कृतार्थ होणे म्हणजे केलेल्या कर्माचे समाधानकारक फळ मिळणे, केलेल्या कामाची पावती मिळणे.

प्रपंचात प्रत्येकजण धावाधाव करीत असतो. एक काम झाले की दुसरे काम ते झाले की तिसरे काम अशी कामाची रांगच लागलेली असते.

पंढरीच्या वारीप्रमाणे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठीच्या मोठी रांग लागली असते व मनांत दर्शन केव्हा होईल यांची चिंता असते. अशावेळी आपला नंबर येतो व तेथे पांडुरंगाचे दर्शन घडते. मन समाधानी होते,

त्यावेळी वाटते, माझे इतके दिवसांचे स्वप्न साकार झाले मी कृतार्थ झालो.

प्रपंचात पण आपण एखादे काम करण्यासाठी ध्येय समोर ठेवतो व त्यादृष्टीने अहोरात्र प्रयत्न करतो. एक दिवस उगवतो जेव्हा त्या कर्माचे फळा समोर येते. तेथे आपली भावना कृतार्थ झाल्याची होेते. ही भावना मानसिक असते.

ध्येयाने पिडीत होऊन ज्यावेळी आपण एखादे कर्म सातत्याने भक्तीने कराते व ती गोष्ट पुर्णत्वास जाते तेथे आपण कृतार्थ होतो. हा भाव स्वत: पुरता असतो, जनार्थ याचा संबंध नसतो.

वक्ता ज्यावेळी भाषणासाठी उभा रहातो, समोर प्रचंड श्रोत्यांची गर्दी पहातो व त्याच्या भाषणाला टाळ्यांचा प्रतिसाद ऐकतो तेव्हा त्या वक्त्याला कृतार्थ झाले असे वाटते.

प्रपंचात पण सर्व गोष्टी सर्वांना समाधानकारक करुन दिल्या, आता मला कोणतीही गोष्ट करण्याची अभिलाषा राहिली नाही. मी प्रपंचात समाधानी आहे असे वाटते ही कृतार्थ भावाची पावती असते.

कृतार्थ होण्यासाठी परमेश्‍वराला आळवावे लागते ते या काव्य पंक्तीतून –

इतुके दे वरदान प्रभू मज इतुके दे वरदान,

ह्रदयी माझ्या नित्य असू दे तुझेच रे गुणगान,

पावन नाम प्रभुचे ह्रदयी माझ्या नित्य वसु दे,

कुणी न माझे मी न कुणाचा, अनित्य सारे येथे जगती,

या सत्याचे सदा सर्वदा राहु दे ध्यान.

Leave a comment