ह.भ.प. नंदकुमार देशपांडे

माजी मुख्याध्यापक निढळ ता. खटाव जि. सातारा
E-mail: -
Brief info

डॉ. प्रकाश भंडारी (बापुजी) हे कोरेगाव येथील प्रतिष्ठीत धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचे नुकतेच ‘चिंतन प्रकाश’ नावाचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना देण्याचे महद् भाग्य मला लाभले, याबद्दल मी परमेश्‍वराचे नितांत आभारी आहे. डॉक्टरांशी आणि माझी खूप वर्षाची जुनी ओळख आहे. जवळ जवळ दोन तपाचा हा प्रवास आहे. त्यांचा पिंड हा मूलत: धार्मिक वृत्तीचा आहे. कोणतेही कर्म करताना डॉक्टर साहेब प्रथमत: सारासार विचार करुन आत्मज्ञानावर आरुढ होवून आपले विचार व्यक्त करतात. ग्रामीण व शहरी भागांत त्यांची विविध विषयांवर प्रवचने, प्रबोधने, चर्चासत्रे झालेली आहेत. त्यांचे या विचार धनामध्ये मलाही सामिल होण्याचे भाग्य लाभले त्यामुळे माझे व त्यांचे ऋणानुबंध जुळले. मी कोरेगाव येथील दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या न्यू सरस्वती इंग्लिश स्कूल येथे उपशिक्षक म्हणून काम करीत होतो. त्यावेळी कोरेगांवमध्ये धार्मिक प्रवृत्तीचा अभ्यास करणारे अनेक मान्यवर होते. त्यामध्ये डॉ. श्री. नी. कात्रे, डॉ. सच्चिदानंद गोसावी, श्री. अर्जुन शिरतोडे, श्री. पोपटराव साबळे, प्राचार्य श्री. अरविंद किरपेकर, तचेस कराड येथील सुभाष शहा यांचा अवर्जुन उल्लेख करावा लागेल. ही सर्व मंडळी आध्यात्माचा प्रचार, प्रसार व अनुकरण करणारी होती.
डॉ. प्रकाश भंडारी हे मुलत: धार्मिक प्रवृत्तीचे कोरेगाव येथील अनेक सामाजिक संस्थांमध्ये त्यांनी विविध पदे भूषविली आहेत. विशेषत: दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटीमध्ये त्यांनी विविध पदावर काम केले. आपला वैद्यकिय व्यवसाय करीत असताना ‘रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा’ या न्यायाने ते आपले काम करीत आहे. संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या भाषेत कर्म करावी चांगुली एवढा निरोप माझा या भावनेतून निष्काम कर्मयोगाची शिकवण त्यांनी अनेक भाविकांना आपल्या स्वमुखातून कथन केली. अहंकाराचा वारा न लागो राजसा या वृत्तीने ते स्वधर्माचे आचरण करीत आले. या सर्वांचा परीपाक म्हणून मुंबई येथील प्रा. नर्मदा भट यांनी त्यांच्या धार्मिक कार्याची दखल घेवून सकल संत चारित्र्य गाथेत त्यांचे चरित्र प्रसिद्ध केले. विशेषत: नाम साधना व भक्तीमार्ग हा कलीयुगातील सोपा मार्ग आहे. असे अवर्जुन डॉक्टर साहेबांनी कथन केले आहे. आपले प्रत्येक कर्म करीत असताना ईश्‍वरार्पण करावे. अहंकाराला थारा देऊ नये, यावर त्यांनी भर देऊन समाज संघटणेचे कार्य केेले. यासर्व विचारांचा समन्वय ‘चिंतन प्रकाश’ या त्यांच्या नवीन पुस्तकात वेगवेगळ्या विषयांच्या माध्यमातून प्रकट झाला आहे. डॉक्टर साहेबांनी आपल्या चिंतनातून समाजाला व जेेष्ठांना, तरुणांना मार्गदर्शन करुन समाज सेवेचे कंकण हाती बांधले. हे सर्व कार्य पाहून त्यांचे हे विचार कोठेतरी पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाले पाहिजे असा ध्यास घेवून एकेदिवशी ङ्गोन करुन त्यांचेशी मी चर्चा करणेसाठी गेलो. दररोज ऐक विचार घेवून चर्चा करावी व त्याचे रेकॉर्डींग करावे, परंतु त्यांनी नकार दिला. मला प्रसिद्धी नको आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मी पुन्हा पुन्हा अग्रह करता व बाबुजींना म्हणालो, “बाबुजी तुमचे विचार भविष्य काळाला मार्गदर्शक ठरतील. तुम्ही विचार मांडा हे सगळे विचार योग्य वेळ आल्यानंतर प्रसिद्ध करा. त्यासाठी तुमच्या घरातील सर्वांची अनुमती घ्या. ” हे सर्व कथन झाल्यावर त्यांनी दोन दिवसांनी आपली धर्मपत्नी, चिरंजीव, हितचिंतक, जवळचे नातेवाईक यांची अनुमती घेवून माझ्या विचाराला पाठींबा दिला. ते दररोज सायंकाळी 5 ते 6 या वेळांत एकऐक विषय निवडून त्यावर चर्चा करत. ही चर्चा ऐकल्यावर मी ही त्यांना अनेक प्रश्‍न विचारुन शंकांचे निरसन करुन घेत असत. अशा प्रकारे 365 चिंतनाचा साठा तयार केला. वास्तविक पहाता तो कालखंड करोनाचा होता. करोनाची लाट आली होती, लोकांचे मनोधैर्य खचले होते. अशा वेळी लोकांना आपल्या चिंतनातून मार्गदर्शन करुन त्यांना आत्मनिर्भर केले. आपल्याला लाभलेले आयुष्य सत्कर्मी लावावे असा अग्रह त्यांनी धरुन जेष्ठांना व तरुणांना मार्गदर्शन केले.
पुस्तकाचे मुखपृष्ठ, मांडणी व विषयांची वर्गवारी त्यांनी सुरेख पद्धतीने केली आहे. या पुस्तकामध्ये समाजातील अनेक विषयाला स्पर्श करुन त्यांनी समाज संघटणेचे उत्तम कार्य केले आहे. त्यांच्या या विवेचनांत सुलभता आहे. जैन तत्वज्ञानाचा स्पर्शपण त्यांच्या चिंतनात जाणवतो. तुकाराम गाथा, भागवत, हरिपाठ, जैन तत्वज्ञान, ब्रम्हचैतन्य महाराज यांचा विशेष अभ्यास करुन अलिकडच्या काळात भाविकांनी, समाज प्रबोधन करणार्‍या लोकांनी नामावर भर देवून भक्तिमार्ग सुलभ करुन घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी चिंतनातून व्यक्त केली आहे.

या पुस्तकातील विचार सर्व जणांना मार्गदर्शक ठरतील, वाचकांनी अवर्जुन या पुस्तकाचे वाचन करावे व ते विचार आचरणात आणावे असे त्यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी प्रत्येकाने करावी, असे मला वाटते. निश्‍चीतपणे हे पुस्तक वाचकांना आनंद देईल. याविषयी मला तिळमात्र शंका नाही. ‘चिंतन प्रकाश’ हे पुस्तक वाचून आपला अभिप्राय कळवावा, असे मला वाटते. डॉक्टर साहेबांनी माझे बद्दल जे प्रेम जो आदर व्यक्त केला त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. मुखपृष्ठ अत्यंत विलोभनीय आहे. त्याकामी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना मी धन्यवाद देतो. या सर्व परिश्रमा मागे डॉक्टर साहेबांचे माता, त्यांचे हितचिंतक त्यांचे सुपुत्र, सुना या सर्वांचा सिंहाचा वाटा आहे. तेव्हा सर्वांनी या पुस्तकाचे वाचन करा अशी मी विनंती करतो. माझ्या जीवनांत हा आनंदाचा दिवस आहे. डॉक्टर साहेबांना दिर्घायुष्य लाभो व त्यांचे हातुन अशीच वाडमय सेवा घडावी, ही ईश्‍वर चरणी प्रार्थना….